
मेटा कंपनीने फेसबुक युजर्सचे फोटो वापरण्यासाठी नविन नियम लागू करुन केले आणि ही परवानगी नाकारण्यासाठी युजर्सना “मी माझी वैयक्तिक माहिती आणि फोटोंच्या वापरासाठी फेसबुक किंवा मेटाला कोणतीही परवानगी देत नाही” अशी पोस्ट शेअर करावी लागणार आहे, असा दावा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही पोस्ट आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल पोस्टसोबत केलेला दावा खोटा असून मेटा किंवा फेसबुकने असा कोणताही नियम लागू केलेला नाही.
काय आहे दावा ?
पोस्ट शेअर करताना युजर्स सुरुवातीला आपल्या नावा पुढे लिहितात की, “मी माझी वैयक्तिक माहिती आणि फोटोंच्या वापरासाठी फेसबुक किंवा मेटाला कोणतीही परवानगी देत नाही. उद्या एक महत्त्वाचा दिवस आहे ज्यावर रात्री 9:20 वाजता अधिकृतपणे शिक्कामोर्तब करण्यात आले आहे आणि ही बातमी टीव्हीवर प्रसारित करण्यात आली आहे. फेसबुकचे नवीन नियम उद्यापासून लागू होतील जे तुमचे फोटो वापरण्याची परवानगी देतात. ही वेळ मर्यादा आज संपत आहे. कृपया हा संदेश कॉपी करा आणि तुमच्या प्रोफाइलवर एक नवीन पोस्ट तयार करून पेस्ट करा. जे असे करत नाहीत त्यांना परवानगी दिल्याचे मानले जाईल. गोपनीयतेचे उल्लंघन केल्यास कायदेशीर परिणाम होऊ शकतात.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
पोस्ट संबंधित कीव्हर्ड सर्च केल्यावर फेसबुक आणि मेटा कंपनीने असे कोणतेही नियम जारी केले आढळत नाही.
डेटावर मेटाची मालकी नाही
व्हायरल दाव्यात असेही सूचित केले आहे की, फेसबुक आणि मेटा युजर्सचे वैयक्तिक फोटो आणि माहिती “वापरू” किंवा “मालकीची” करू इच्छितो.
परंतु, मेटाच्या सेवा आणि अटी विभागाच्या आढाव्यामध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की, युजर्स जे काही पोस्ट (फोटो, व्हिडिओ आणि संदेश) करतात त्याची मालकी त्यांचीच (युजर्स) असते. तरीही, युजर्स फेसबुक व इंस्टाग्रामवर कंटेंट अपलोड, बदल किंवा प्रसारित करताना त्या प्लॅटफॉर्मच्या कार्यक्षमतेनुसार परवानगी देऊ शकतात.
उदाहरणार्थ – युजर्स कंटेंट सार्वजनिक किंवा मित्रांपुरते मर्यादित ठेवण्यासाठी, फोटो व व्हिडिओचा आकार किंवा रंग बदलण्यासाठी, सर्व्हरवर डेटाचा बॅकअप घेण्यासाठी संबंधित प्लॅटफॉर्मला परवानगी देऊ शकतात.
परंतु, याचा अर्थ असा होत नाही की, मेटा युजर्सचे फोटो स्वतःचे असल्याचा दावा करू शकतो किंवा तुमचा खासगी डेटा विकू शकतो.
सेटिंग्स द्वारे डेटा सुरक्षित
युजर्सने आपला डेटा (फोटो, व्हिडिओ आणि संदेश) खाजगी राखण्यासाठी किंवा सार्वजनिक करण्यासाठी फेसबुकमधील गोपनीयता सेटिंग्सचा वापर करावा. यामध्ये युजर्स आपल्या सोयीनुसार पोस्ट व डेटा खाजगी, सार्वजनिक किंवा फक्त काही विशिष्ट लोकांपुर्ते मर्यादित ठरवू शकतो. व्हायरल मेसेज पुन्हा पोस्ट केल्याने या नियंत्रणांवर कोणताही परिणाम होत नाही. जर एखाद्या व्यक्तीला आपल्या डेटाच्या गोपनीयतेबद्दल काळजी असेल, तर त्यासंबंधित प्लॅटफॉर्मच्या सेटिंग्समध्ये जाईन आपला डाटा खाजगी करणे हा एकमेव पर्याय आहे.
मेटाचे खंडण
याव्यतिरिक्त, फॅक्ट क्रेसेंडोने मेटा प्रवक्त्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी स्पष्ट केले की, व्हायरल पोस्टसोबत केलेला दावा खोटा असून मेटा व फेसबुकने असे कोणतेही नियम किंवा अटी जारी केलेल्या नाहीत. मेटाचे अलीकडील नियम व अटी येथे वाचू शकतात.
निष्कर्श
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल पोस्टसोबत केलेला दावा खोटा असून मेटा किंवा फेसबुकने असा कोणताही नियम लागू केलेला नाही. युजर्स आपला डेटा गोपनीय आणि सुरक्षित ठेवण्यासाठी अधिकृत सेटिंग्सचा वापर करु शकतात. खोट्या दाव्यासह पोस्ट व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:फेसबुकने वैयक्तिक फोटो वापरण्यासाठी नवीन नियम लागू केले नाही; वाचा सत्य
Fact Check By: Sagar RawateResult: False
