
नुकतेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला राज्यात घवघवीत यश मिळाले. नाशिक लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी विजय मिळविला आहे. त्यांनी महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांचा पराभव केला. त्यानंतर सोशल मीडियावर विजय रॅलीचा व्हिडिओ व्हायरल होत असून त्यात एक चांद-सितारा असणारा हिरवा झेंडा दिसतो.
दावा केला जात आहे की, उद्धव ठाकरे गटाच्या जल्लोषामध्ये पाकिस्तानचा ध्वज फडकविण्यात आला.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमध्ये इस्लामिक झेंडा आहे. तो पाकिस्तानचा ध्वज नाही.
काय आहे दावा?
व्हायरल व्हिडिओमध्ये जल्लोष करणारे कार्यकर्ते हिरवे, पिवळे आणि भगवे झेंडे घेऊन नाचत आहेत. सोबत लिहिले आहे की, नाशिकच्या शिवसेना कार्यलयासमोर पाकिस्तानचा झेंडा फडकविण्यात आला.
मूळ व्हिडिओ – फेसबुक । फेसबुक । अर्काइव्ह
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम तर व्हिडियोतील झेंड्याची पाकिस्तानच्या झेंड्याशी तुलना करून पाहू.
पाकिस्तानच्या शासकीय माहितीनुसार, पाकिस्तानच्या झेंड्यामध्ये हिरवा आणि पांढरा रंग आहे. तसेच मध्यभागी चांद-सितारा आहे. व्हिडियोतील झेंडा पूर्णतः हिरवा असून त्यामध्ये चांद-सितारा डावीकडे वरच्या बाजूस आहे. यावरून हे सिद्ध होते की, हा झेंडा पाकिस्तानचा नाही.
हिरवा झेंडा कोणता आहे?
व्हायरल व्हिडिओतील झेंडा हा इस्लामिक ध्वज आहे. इस्लामिक झेंड्यावर चंद्राचे शीर्ष झेंड्याच्या आतील बाजूस असते तर पाकिस्तानी झेंड्यावर चंद्र थोडासा तिरका बाहेरच्या बाजुला असतो. बऱ्याच वेळा सोशल मीडियावर इस्लामिक ध्वजाला पाकिस्तानचा झेंडा समजून चुकीची माहिती पसरविली जाते. दोन्हींमधील फरक तुम्ही येथे वाचू शकता.
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओतील झेंडा पाकिस्तानचा ध्वज नाही. तो झेंडा इस्लामिक ध्वज आहे. चुकीच्या दाव्यासह हा व्हिडिओ शेअर केला जात आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गटाच्या विजयी रॅलीमध्ये पाकिस्तानी झेंडा नव्हता; तो इस्लामिक झेंडा आहे
Fact Check By: Agastya DeokarResult: False
