
निवडणुकीच्या काळात राजकारण्यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ खोट्या दाव्यासह शेअर केले जातात. अशाच एका व्हिडिओमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे दरवाजाबाहेर दिसतात.
हा व्हिडिओ शेअर करताना दावा केला जात आहे की, प्रियंका गांधी उमेदवारी अर्ज दाखल करताना मल्लिकार्जुन खरगे दलित असल्याकारणाने त्यांना दरवाजाबाहेर ताटकळत उभे ठेवले.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओसोबत केलेला दावा खोटा आहे. प्रियांका गांधी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना त्या कक्षेत मल्लिकार्जुन खरगे उपस्थित होते.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये दाराच्या मागे मल्लिकार्जुन खरगे आणि त्यांच्या समोर एक व्यक्ती दिसते. व्हिडिओमधील ग्राफिकमध्ये लिहिले आहे की, “प्रियंका गांधी वायनाडमधून अर्ज भरताना, मल्लिकार्जुन खरगेंना ताटकळत बाहेर उभे ठेवले. काँग्रेस अध्यक्ष असूनही एक दलित म्हणून खरगेंना काँग्रेस अशी अपमानास्पद वागणूक देते.”
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “हा आहे काँग्रेसचा दलितविरोधी चेहरा.”
मूळ पोस्ट – इंस्टग्राम | आर्काइव्ह | इंस्टग्राम | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
कीव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, भाजप नेते राजीव चंद्रशेखर यांनी हाच व्हिडिओ 23 ऑक्टोबर रोजी आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला होता.
याला ट्विटला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी प्रियांका गांधी यांचा उमेदवारी अर्ज सादर करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये प्रियांका गांधींना उमेदवारी अर्ज भारताना त्यांच्या शेजारी मल्लिकार्जुन खरगे बसलेले दिसतात.
अधिक तपास केल्यावर असताना आम्हाला एएनआयच्या यूट्यूब चॅनलवर प्रियंका गांधी यांच्या उमेदवारी अर्जाचा संपूर्ण व्हिडिओ सापडला.
सदरील व्हिडिओमध्ये प्रियांका गांधी, त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा, मुलगा रेहान आणि आई सोनिया गांधी कलेक्टरसमोर बसलेले दिसतात.
यानंतर रॉबर्ट वाड्रा, रेहान बाहेर जातात आणि प्रियांका गांधी यांच्या सोबत मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि के.सी. वेणुगोपाल दिसतात.
या घटनेची अधिक माहिती घेण्यासाठी आम्ही राहुल गांधी यांच्या वायनाड कार्यालयाशी संपर्क साधल्यावर राहुल गांधी यांचे पी.एस. ऑगस्टीन यांनी व्हायरल दावाचे खंडण करताना सांगितले की, “सर्वप्रथम प्रियंका गांधी त्यांचे पती रॉबर्ट वड्रा आणि मुलगा रेहान उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले होते. यावेळी राहुल गांधी, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धिरामय्या आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांसारख्या नेते उपस्थित होते.कायद्यानुसार कार्यालयात फक्त पाच जणांना बसण्याची परवानगी आहे. त्यामुळे काही काळासाठी अनेक नेते कार्यालया बाहेर होते. नंतर राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि इतर नेते प्रियंका गांधींची कार्यालयात भेट घेतात.”
उमेदवारांची हँडबुक नियमावली
केरळ निवडणूक आयोगाच्या उमेदवारांच्या हँडबुकमधील 3.12 नियमानुसार उमेदवार नामनिर्देशनपत्र सादर करताना निवडणूक अधिकाऱ्यांसमोर उमेदवारासह जास्तीत जास्त 5 लोक असावेत.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल होत असलेला दावा खोटा असून प्रियांका गांधी उमेदवारी अर्ज दाखल करत असताना जिल्हाधिकारी कार्यालयात कक्षेत मल्लिकार्जुन खरगे उपस्थित होते.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:प्रियांका गांधी उमेदवारी अर्ज दाखल करताना मल्लिकार्जुन खरगेंना प्रवेश न दिल्याचा गैरसमज व्हायरल
Written By: Sagar RawateResult: False
