
सोशल मीडियावर एबीपी न्यूज चॅनेलच्या लोगोसह एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी अदानी समुहाकडून 500 कोटी रुपये घेतल्याची बातमी दाखविण्यात आली आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल बातमी खोटी असून एबीपी न्यूजने असा कोणताही व्हिडिओ जारी केलेला नाही.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये एबीपी न्यूज चॅनलची बातमी दिसते. ज्यामध्ये म्हटले आहे की, “सुत्रांनुसार विधासभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी अदानी कडून 500 कोटी घेतले.”
युजर्स ही बातमी शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “आदरणीय शरदचंद्र पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांनी उद्योगपती अदानी यांच्याकडून मदत म्हणून उकळले जवळपास रुपये 500 कोटी.”
मुळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रोहित पवारांनी अदानी समुहाकडून 500 कोटी रुपये घेतले ही नक्कीच मोठी बातमी ठरली असती. परंतु, अशी कोणतीही अधिकृत व विश्वासार्ह बातमी आढळून येत नाही.
विशेष म्हणजे एबीपी न्यूजच्या वेबसाईट किंवा सोशल मीडिया अकाउंट्सवरदेखील (फेसबुक, ट्विटर आणि युट्यूब) व्हायरल व्हिडिओमधील बातमी आढळत नाही.
एबीपीचे खंडण
फॅक्ट क्रेसेंडोने एबीपी माझाचे सोशल मीडिया प्रमुख मेघराज पाटील यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी स्पष्ट केले की, “व्हायरल बातमी एबीपी न्यूज चॅनेलद्वारे जारी करण्यात आलेली नाही. तसेच या व्हिडिओमधील ग्राफिक्स, फॉन्ट आणि व्हाईसओव्हर एबीपीचे नाही. व्हायरल व्हिडिओमधील बातमी पूर्णपणे खोटी आहे.”
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ फेक असून अशी कोणतीही बातमी एबीपीने जारी केलेली नाही. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खोटी बातमी व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:रोहित पवार यांनी अदानींकडून 500 कोटी घेतल्याचा फेक व्हिडिओ व्हायरल; वाचा सत्य
Fact Check By: SAGAR RAWATEResult: False
