
एलॉन मस्क यावर्षीच्या शेवटी चार्जिंग आणि इंटरनेटची गरज नसलेला एक अधुनिक फोन लॉंच करणार आहे, असा दावा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल दावा खोटा आहे. एलॉन मस्क व त्यांच्या कंपनीने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही.
काय आहे दावा ?
व्हायरल पोस्टमध्ये एक फोन दिसतो. या फोनवर टेस्ला-पाय नावाचा लोगो दिसतो.
युजर्स ही पोस्ट शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “एलॉन मस्क 2024 च्या शेवटी Tesla Pi मोबाईल फोन लाँच करत आहे. या मोबाईल फोनमध्ये दोन वैशिष्ट्ये आहेत जी कोणत्याही मोबाईल कंपनीमध्ये उपलब्ध नाहीत. 1. या मोबाईलला चार्जिंगची गरज नाही, तो सूर्यप्रकाशाने आपोआप चार्ज होतो, खिशात असला तरी तो चार्ज होतच राहील ! 2. या टेस्ला मोबाइलला इंटरनेट कनेक्शनची आवश्यकता नाही, ते टेस्लाच्या इंटरनेट स्टारलिंक उपग्रहासह कार्य करते, त्यामुळे तुम्ही कुठेही असाल, चंद्रावरही, हे मोबाइल इंटरनेट कार्यरत राहील!”
मूळ पोस्ट — फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम अशी कोणती घोषणा एलॉन मस्क किंवा त्यांच्या कंपनीने केली असती तर ही लक्षवेधी बातमी ठरली असती. परंतु, कोणत्याही अधिकृत माध्यामावर अशी बातमी आढळत नाही.
अधिक सर्च केल्यावर क्लीनटेक्निका नामक ट्विटर आकाउंटने 2020 मध्ये शेअर केला एक लेख आढळला. लेखाचे शीर्षक होते की, “टेस्ला स्मार्टवॉच विकसित करत नाही.”
या लेखावर प्रतिक्रिया देत एलॉन मस्क ट्विट करत लिहितात की, “नक्कीच नाही. स्मार्टवॉच आणि फोन हे भूतकाळाचे तंत्रज्ञान आहेत, न्यूरालिंक्स हे भविष्य आहे.”
मस्कचे खंडण
इलॉन मस्क यांनी 18 ऑक्टोबर रोजी फिलाडेल्फियामधील टाऊन हॉल प्रश्नोत्तरांदरम्यान त्यांनी आपण फोन तयार करण्यास इच्छूक नसल्याचे स्पष्ट केले.
इलॉन मस्क म्हणतात की, “आम्हाला फोन बनवण्याची गरज वाटत नाही. फोन बनवायचा असेल तर करू, पण अस काही करण्याची माझी इच्छा नाही.”
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल दावा खोटा असून एलॉन मस्कने 2024 च्या शेवटी चार्जिंग आणि इंटरनेटची गरज नसलेला फोन लॉंच करण्याची घोषणा केली नाही. खोट्या दाव्यासह हा दावा व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:एलॉन मस्क चार्जिंग आणि इंटरनेटची गरज नसलेला फोन लाँच करणार का ? वाचा सत्य
Written By: Sagar RawateResult: False
