
तब्बल सात वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या दौऱ्यावर गेले आहेत. याच पार्श्वभूमीवर एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ड्रोनचा वापर करुन पंतप्रधान मोदी चेहरा आणि ‘मोदींचे चीनमध्ये स्वागत आहे’ असे लिहिले दिसते.
दावा केला जात आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या दौऱ्यावर असताना तेथील सरकारने ड्रोनद्वारे त्यांचा चेहरा तयार करत कलाकृती दाखवत त्यांचे चीनमध्ये स्वागत केले.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटो बनावट आहे.
काय आहे दावा ?

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर काळाले की, सुप्रान्स चीन नामक इंस्टाग्राम पेजने हाच फोटो 26 ऑगस्ट रोजी शेअर केला होता.
कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “सुप्रान्स चीन कार्यालयाकडून मोदीजींचे चीनमध्ये स्वागत आहे. मोदीजी चीनमधील एससीओ शिखर परिषदेसाठी आले आहेत.”
तसेच सोबत लिहिले होते की, “इथे दाखवलेली सर्व चित्रे ही बातमीसाठी केलेल्या माहिती गोळा करण्याच्या कामातून, कारखान्यांना दिलेल्या भेटीतून किंवा शैक्षणिक व व्यावसायिक कारणांसाठी तयार केलेल्या एआय दृश्यांतून घेतली आहेत. कुणाला फसवण्याच्या उद्देशाने त्यात कोणताही बदल केलेला नाही. इतर कोणत्याही गोष्टींसारखे वाटल्यास तो फक्त योगायोग आहे.”

मूळ पोस्ट – इंस्टाग्राम | आर्काइव्ह
पुढे रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर शिन्हुआ न्यूज नामक वृत्तसंस्थाने 19 एप्रिल रोजी ड्रोन शोचा मुळ फोटो शेअर केल्याचे आढळले.
या वृत्तानुसार, हा ड्रोन शो 15 मिनिटाचा असून नैऋत्य चीनमधील चोंगकिंग नगरपालिकेतील नानआन जिल्ह्यात झाला होता. तसेच दर शनिवारी, सुट्टीच्या दिवशी आणि इतर महत्त्वाच्या प्रसंगी आयोजित केला जातो.

मूळ पोस्ट – शिन्हुआ न्यूज
व्हायरल फोटो बनावट
शेन शिवेई नामक चिनी पत्रकारानेदेखील ट्विटरवर व्हायरल फोटो आणि शिन्हुआ न्यूजच्या बातमीचा स्क्रिनशॉट शेअर करत लिहिले की, “भारतीय पंतप्रधानांचे ‘स्वागत’ असे लिहिलेले चित्र बनावट आहे.”
खालील तुनात्मक फोटो पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, मुळ फोटो एडिट करुन त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा आणि ‘मोदींचे चीनमध्ये स्वागत आहे’ असे मजकूर लिहिले आहे.

खालील व्हिडिओमध्ये आपण चीन सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे केलेले स्वागत पाहू शकता.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल फोटो बनावट असून चीनमधील ड्रोन शोच्या एका दृष्याचा स्क्रिनशॉट एडिट करुन चुकीच्या दाव्यासह व्हायरल केला जात आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:चीनमध्ये ड्रोनद्वारे पंतप्रधान मोदींचा चेहरा तयार करत स्वागत केले नाही; बनावट फोटो व्हायरल
Fact Check By: SAGAR RAWATEResult: Altered
