FACT-CHECK: राहुल गांधींनी पंतप्रधानांना फोन करून युद्धातून माघार घेण्यास सांगितले होते का?

Altered राजकीय | Political

राहुल गांधींच्या एका विधानाची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ते कथितरीत्या बोलताना दिसतात की, त्यांनी पंतप्रधान मोदींना फोन करून भारत-पाकिस्तान युद्धातून त्वरीत माघार घेण्यास सांगितले होते. या व्हायरल क्लिपच्याआधारे यूजर्स राहुल गांधींवर पाकिस्तान समर्थक असल्याची टीका करीत आहेत. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ अर्धवट आहे. मूळ भाषणात राहुल गांधी स्वत:बद्दल नाही, तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना युद्धातून माघार घेण्यास फोन केला होता असे सांगत होते.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये राहुल गांधी म्हणतात की, “जेव्हा भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू होते, तेव्हा मी नरेंद्र मोदींना फोन करून सांगितले – तुम्ही जे काही करत आहात ते 24 तासांच्या आत थांबवा.” 

व्हिडिओच्या ग्राफिकमध्ये लिहिलेले होते की, “युद्ध थांबवा म्हणून पाकिस्तानची दलाली करणारा ! पण मोदींनी याला फाट्यावर मारत पाकिस्तानला ठोकला !”

हा व्हिडिओ शेअर करताना यूजर्स कॅप्शनमध्ये लिहितात की, “पाकिस्तानची दलाली हा आरोप पटतो का?”

मूळ पोस्ट – इंस्टाग्राम | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल क्लिपमधील विधान राहुल गांधींनी बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यातील गायघाट गावमध्ये 27 ऑगस्ट रोजी ‘मतदार हक्क यात्रे’दरम्यान केलेल्या भाषणात केले होते. या भाषणाची संपूर्ण कॉपी आणि व्हिडिओ काँग्रेसच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे.

संपूर्ण भाषण ऐकल्यावर कळते राहुल गांधी स्वत:बद्दल नाही, तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना केलेल्या कथित कॉलबद्दल बोलत होते.

वरील भाषणाच्या 17:25 मिनिटापासून राहुल गांधी म्हणतात, “ट्रम्प आज म्हणाले की, जेव्हा भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू होते, तेव्हा मी नरेंद्र मोदींना फोन करून सांगितले – तुम्ही जे काही करत आहात ते 24 तासांच्या आत थांबवा. आणि नरेंद्र मोदींनी 24 तासांत नाही तर 5 तासांत सगळं थांबवलं.”

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ अर्धवट आहे. मुळात राहुल गांधी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना यांच्यातील कथित फोनबद्दल बोलत होते. मूळ व्हिडिओतील डोनाल्ड ट्रम्प यांचा उल्लेख गाळून अर्धवट क्लिप चुकीच्या दाव्यासह शेअर केली जात आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:FACT-CHECK: राहुल गांधींनी पंतप्रधानांना फोन करून युद्धातून माघार घेण्यास सांगितले होते का?

Fact Check By: Sagar Rawate  

Result: Altered