
महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवरी रोजी बारामतीमध्ये एका विमान अपघातात निधन झाले. या दुर्घटनेदरम्यान त्यांच्यासोबत असलेल्या इतर चार जणांचाही मृत्यू झाला.
या पार्श्वभूमीवर एका पायलटचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, या दुर्घटनेत कॅप्टन साहिल मदान नामक पायलटचाही मृत्यू झाला आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटोमधील पायलट अपघातादरम्यान विमानात नव्हते.
काय आहे दावा ?
व्हायरल फोटोमध्ये अपघातग्रस्त ठिकाण आणि एका पायलटचा फोटो दाखवला आहे.
ग्राफिकमध्ये लिहिले होते की, “आकाशाला आपलं घर मानणाऱ्या एका कुशल वैमानिकाचा प्रवास आजअर्ध्यावर थांबला. 16 वर्षाचा दांडगा अनुभव आणि आकाशावर निर्विवाद प्रभुत्व, पण आज नियतीने डाव फिरवला… कॅप्टन साहिल मदान यांनी शेवटच्या क्षणापर्यंत आपले कर्तव्य बाजवले, पण दुर्दैवाने त्यांचा हा प्रवास अपूर्ण राहिला. एका निष्ठावान आणि शूर वैमानिकाला भावपूर्ण श्रध्दांजली !”
युजर्स हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “16 वर्षाचा दांडगा अनुभव असून पण नियती पुढे झुकाव लागलं , कॅप्टन साहिल मदान यांनी शेवटच्या क्षणापर्यंत आपले कर्तव्य बजावले.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
सदरील दाव्याचा आधार घेत किव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, बारामती विमान दुर्घटनेमध्ये कॅप्टन साहिल मदान यांचा मृत्यू झाला नसून ते जिवंत आहे.
बीबीसीने दिलेल्या बातमीनुसार, या विमानात दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक, सुरक्षारक्षक विदिप जाधव, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी हे कर्मचारी अपघातात मृत्यू झाला.
अधिक सर्च केल्यावर काळाले की, पायलट इन-कमांड, कॅप्टन सुमित कपूर आणि फर्स्ट ऑफिसर, शांभवी पाठक हे अनुभवी व्यावसायिक होते आणि त्यांनी 15,000 तासांहून अधिक उड्डाण केले होते. त्यांची ओळख विमान ऑपरेटर, व्हीएसआर एव्हिएशनने पुष्टी केली. परंतु, या ठिकाणी कोठेही कॅप्टन साहिल मदान यांचे नाव आढळत नाही. अधिक महिती येथे व येथे वाचू शकतो.
खाली दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पायलट संबंधित दिलेल्या बातमीचे स्क्रिनशॉट आहे. या ठिकाणीदेखील कॅप्टन साहिल मदान यांचा व्हायरल फोटो दिसत नाही.

मूळ पोस्ट – डेक्कन हेराल्ड | द टाईम्स ऑफ इंडिया
एका पोस्टमुळे चर्चा
डीएनए इंडिया न्यूजने आपल्या इंस्टग्रामवर व्हायरल फोटो शेअर करत बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातात कॅप्टन साहिल मदान यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
परंतु, या पोस्टवर संजम साहनी नामक महिलेने कमेंट केली की, “कृपया ही बातमी काढून टाका. कॅप्टन साहिल मदान हे माझे पती आहेत आणि ते विमानात नव्हते.”

मूळ पोस्ट – डीएनए इंडिया इंस्टग्राम | आर्काइव्ह
कॅप्टन साहिल मदान
पुढे, व्हायरल फोटो रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कॅप्टन साहिल मदान यांची लिंक्डइन प्रोफाइल आढळली. जिथे तोच फोटो वापरल्याचे दिसते.
साहिल मदान यांच्या प्रोफाइलनुसार ते गेल्या दोन वर्षांपासून व्हीएसआर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये काम करत आहे.

मूळ पोस्ट – लिंक्डइन
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल फोटोमधील कॅप्टन साहिल मदान जिवंत असून दुर्घटनेच्या वेळी ते विमानात नव्हते. भ्रामक दाव्यासह फोटो व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)
Title:विमान अपघातात अजित पवार यांच्यासोबत कॅप्टन साहिल मदान यांचासुद्धा मृत्यू झाला का ? वाचा सत्य
Fact Check By: SAGAR RAWATEResult: False


