भाजप SC, ST आणि OBC आरक्षाण रद्द करणार असे अमित शाह म्हणाले का ? वाचा सत्य

Altered राजकीय | Political

सध्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अमित शाह भाषण देताना भाजप सरकार एससी एसटी आणि ओबीसी वर्गांचे आरक्षण संपवून टाकणार असे सांगतात.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून याबद्दल सत्य माहितीची विचारणा केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ एडिट केलेला आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये अमित शहा म्हणतात की, “जर भाजपाचं सरकार आलं तर SC, ST आणि OBC आरक्षण संपवून टाकू.”

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “महाराष्ट्र राज्यातील ‘SC ST OBC converted minorities आणि महिलांच्या’ संवैधानिक प्रतिनिधित्वाला म्हणजेच आरक्षणाला काढणार आणि त्या जागी संपूर्ण विदेशी ब्राह्मण भरणार.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह 

तथ्य पडताळणी

व्हायरल व्हिडिओमध्ये ‘V6 न्यूज’चा लोगो दिसतो.

हा धागा पकडून कीवर्ड सर्च केले असता कळाले की, V6 न्यूज तेलुगू चॅनलने अमित शाहच्या भाषणामधील काही भाग 23 एप्रिल 2023 रोजी युट्यूवर अपलोड केला होता. 

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी मुस्लिम आरक्षणावर भाष्य केले.”

सदरील माहितीच्या अधारे कीवर्ड सर्च केल्यावर कळाले की, अमित शाह यांनी 23 एप्रिल 2023 रोजी तेलंगणामधील चेवेल्ला शहरात विजया संकल्प सभेत हे भाषण केले होते.

भाषणात 14 मिनिट 40 सेकंदावर अमित शाह म्हणतात की, “भाजपला सत्तेत आल्यास राज्यातील मुस्लिमांना मिळणारे असंवैधानिक 4 टक्के आरक्षण संपुष्टात येईल. हा अधिकार तेलंगणातील एससी, एसटी आणि ओबीसी समाजाचा आहे आणि त्यांना हा अधिकार दिला जाईल. आम्ही मुस्लिम आरक्षण संपवून टाकू.”

ते विधान आपण येथे पाहू शकता.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ एडिटेड आहे. मूळात अमित शाह तेलंगणातील मुस्लिम आरक्षण संपवून ते एसी, एसटी आणि ओबीसीला देण्याचे सांगत होते. खोट्या दाव्यासह एडिटेड व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:भाजप SC, ST आणि OBC आरक्षाण रद्द करणार असे अमित शाह म्हणाले का ? वाचा सत्य

Written By: Sagar Rawate  

Result: Altered