
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये उद्धव ठाकरे जाहिरातीचे कौतुक करताना दिसतात. दावा केला जात आहे की, “उद्धव ठाकरेंनी महायुतीच्या जाहिरातीचे कौतुक केले.”
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ एडिटेड आहे. मूळ व्हिडिओमध्ये उद्धव ठाकरे व्यंग्यात्मक टिप्पणी केली होती.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये उद्धव ठाकरे म्हणतात की, “भाजप बरोबरीने किंवा भाजप पेक्षा काकण भर सरस असे महाराष्ट्र भर होर्डीग लावले आहेत. त्यांचे स्लोगन मला आवडते. केलय काम भारी आता पुढची तयारी. अस जर वाचल तर बर वाटत. मी जाहिरात क्षेत्रातला असल्यामुळे हल्ली अस बघायला कमी मिळत.”
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “उबाठाने केलं महायुतीच्या जाहिरातीचे कौतुक !”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ उद्धव ठाकरेंच्या बी.के.सी.मुंबईमधील सभेचा आहे.
स्मार्ट पुणेकर न्यूज युट्यूब चॅनलने 19 नोव्हेंबर रोजी या सभेचे थेट प्रक्षेपण केले होते.
वरील व्हिडिओमधील उद्धव ठाकरेंचे संपूर्ण भाषण पाहिल्यावर कळते की, ते महायुतीच्या जाहिरातीबद्दल कौतुकाच्या स्वरात बोलत नाव्हते.
या व्हिडिओमध्ये 30:02 मिनिटावर उद्धव ठाकरे भाषण सुरु करण्यापूर्वी जाहिराती बाबत बोलतात की, “महाराष्ट्रभर फिरताना सगळीकडे मोठमोठी लागलेली होर्डीग दिसतात. नुसत्या होर्डीगवरुन अपल्याला कल्पना येईल की, कोणी किती पैसे खाल्ले आहेत. अगदी मिंध्यांनी सुद्धा भाजप बरोबरीने किंवा भाजप पेक्षा काकणभर सरस महाराष्ट्रभर होर्डीग लावले आहेत. पण त्यांचे स्लोगन मला नेहमी आवडते. ‘केलय काम भारी, लुटली तिजोरी, केली गद्दारी, करतो लाचारी, आता पुढची तयारी.’ मी जाहिरात क्षेत्रातला असल्यामुळे हल्ली अस बघायला कमी मिळत.”
खालील तुलनात्मक व्हिडिओ पाहिल्यावर आपल्या लक्षात येते की, मूळ व्हिडिओ एडिट करुन चुकीच्या दाव्यासह पसरवले जात आहे.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ एडिटेड आहे. मुळात व्हिडिओमध्ये उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाच्या जाहिरातीवर व्यंग्यात्मक टिप्पणी केली होती. ते महायुतीच्या जाहिरातीबद्दल कौतुकाच्या स्वरात बोलत नव्हते. चुकीच्या दाव्यासह हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:उद्धव ठाकरेंनी महायुतीच्या जाहिरातीचे कौतुक केले नाही; एडिटेड व्हिडिओ व्हायरल
Written By: Sagar RawateResult: Altered
