
एका वयोवृद्ध महिलेला अमानुष मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जोडप्याकडून एका आजीबाईचा होत असलेला छळ पाहून नेटकरी संतापाने त्यांच्यावर कडक करावाई करण्याची मागणी करीत आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ मध्यप्रदेश येथील असून गेल्या वर्षी (2024) भोपाळमधील पती-पत्नीने त्यांच्या आजीसासूला ही मारहाण केली होती.
काय आहे दावा?
अडीच मिनिटांच्या व्हिडिओमध्ये एक पुरुष व महिला एका वृद्ध महिलेला अमानुषपणे मारहाण करत असल्याचे दिसते. वृद्ध महिलेचा आवाज बाहेर जाऊ नये म्हणून तो पुरुष तिचा गळा आवळून तोंड दाबतो. तसेच, पलंगावर बसलेली त्याची पत्नी काठीने त्या वृद्ध महिलेला मारते.
लपून काढलेल्या या व्हिडिओवरून सोशल मीडियावर ज्येष्ठांना मिळणारी वागणूक आणि सुरक्षेविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.
हा व्हिडिओ शेअर करताना नेटकरी लिहितात की, “मी देवाला प्रार्थना करतो की ज्या वृद्धांकडे संपत्ती आहे त्यांना अशा शेवटच्या टप्प्याचा सामना कधीही करावा लागू नये. मुलगा आणि सुनेला शिक्षा होईपर्यंत कृपया तुम्ही जिथे असाल तिथे सर्व ग्रुपमध्ये हे शेअर करा.”
[टीप: व्हिडिओतील दृश्य विचिलित करणारे असल्यामुळे ते येथे दाखविणे टाळले आहे]
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम व्हिडिओतील की फ्रेम्स रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, हा व्हिडिओ 2024 पासून इंटरनेटवर उपलब्ध आहे. म्हणजेच ही घटना जुनी आहे.
अधिक शोध घेतल्यावर इंडिया टुडेने 27 मार्च 2024 रोजी प्रकाशित केलेली बातमी आढळली. त्यानुसार, मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये ही घटना घडली होती.
मारहाण करणाऱ्या जोडप्याचे नाव दीपक आणि पूजा सेन असून ते भोपाळच्या बारखेडी भागातील आहेत. सदरील पीडित महिला दीपकची आजी आहे.
दीपक व पूजा यांनी आजीला मारहाण करतानाचा व्हिडिओ घरमालकाने चित्रित केला होता. तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पती-पत्नी पळून जात असताना भोपाळ पोलिसांनी त्यांनी अटक केली होती.
मूळ बातमी – इंडिया टुडे
तत्कालीन पोलिस उपायुक्त प्रियांका शुक्ला यांनी माहिती दिली होती की, पीडित महिलेचे नाव बाती सेन (75) आहे. घरगुती आणि मालमत्तेच्या वादातून त्यांच्या नातू व नातसुनेने त्यांना 21-22 मार्च 2024 रोजी मारहणा केली होती.
मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ जहांगीरबाद ठाण्यात गुन्हात दाखल करीत आरोपी पती-पत्ती दीपक आणि पूजा यांना अटक केले.
पीडित वृद्ध महिलेने चौकशीत सांगितले की, गेल्या दोन-तीन महिन्यांपासून अशी मारहाण होत होती. या प्रकरणात तत्कालीन भारतीय दंड संहितेच्या कलम 294, 323, 325, 506, 342 आणि 34 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता.
मूळ बातमी – एएनआय
निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ एक वर्ष जुना असून सदरील घटना भोपाळमध्ये घडली होती. आजीला अमानवीपद्धीने मारहाण करणाऱ्या पती-पत्नीला या प्रकरणी अटक करून कायदेशीर कारवाई करण्यात होती.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:आजीबाईला अमानुष मारहाण करणाऱ्या पती-पत्नीचा तो व्हिडिओ मध्य प्रदेशमधील; वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: MISSING CONTEXT
