
राष्ट्रीय समाज पक्षाचे दौंड येथील आमदार राहुल कुल यांचा खून करणासाठी केलेल्या भ्याड हल्ल्याचा विरोध करणाऱ्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहे. सोबत झी 24 तास वृत्तवाहिनीच्या बातमीचा दाखला दिला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली.
फेसबुकवर पसरविल्या जाणाऱ्या या पोस्टमध्ये म्हटेल की, या भ्याड हल्याला जनता मतदान करून प्रतिउत्तर देईल. राहुल कुल यांच्या खुणाचा प्रयत्न उघड…!! विरोधक आता पराभवाच्या भीतीचे जीवावर उठले…!!
सोबत झी 24 तास वृत्तवाहिनीवरील एका बातमीचा व्हिडियोदेखील शेयर केला आहे. विशेष म्हणजे व्हिडियोची लिंक नाही तर, संपूर्ण व्हिडियोच अपलोड करण्यात आला आहे.
तथ्य पडताळणी
पोस्टमधील दाव्यानुसार आमदार राहुल कुल यांच्या खुनाचा प्रयत्न आता उघडकीस आला. तसेच पोस्टमध्ये ‘भ्याड हल्ल्याचा’ असादेखील उल्लेख आहे. त्यामुळे आम्ही सर्वप्रथम राहुल कुल यांच्यावर खरंच असा हल्ला किंवा खुनाचा प्रयत्न झाला का याचा शोध घेतला.
सर्वप्रथम आम्ही झी 24 तासची मूळ बातमी तपासली. तेव्हा असे लक्षात आले की, बातमी गेल्या वर्षी 1 ऑक्टोबरची आहे. म्हणजे सात महिन्यांपूर्वीची आहे.

त्यानंतर मग आम्ही मूळ व्हिडियो तपासला. यामध्ये राहुल कुल यांच्या खुनाचा कट उघड झाल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी दोघांना अटक केले होते. बातमीत स्वतः आमदार कुल यांनी प्रतिक्रिया देताना हा कट कोणी रचला याचा पोलिस तपास करीत असल्याचे सांगितले. त्यांनी कोणावरही संशय व्यक्त केला नाही. हा व्हिडियो तुम्ही खाली पाहू शकता.
राहुल कुल यांच्या गाडीला एका अवजड वाहनाने धडक देऊन स्फोटकांच्या साह्याने घातपात करण्याचा दोघाजणांनी कट रचला होता. प्रकरणी सागर विनायक भानवसे (रा. वरवंड, ता. दौंड) आणि आकाश राजेंद्र होले (रा. पाटस, ता. दौंड) या दोघांना अटक करण्यात आली होती.

मूळ बातमी येथे वाचा – महाराष्ट्र टाईम्स
एबीपी माझाच्या वृत्तानुसार, या दोघांनी बनावट नावाने सीम कार्ड खरेदी करून त्याद्वारे राहुल कुल यांचा खून होणार असल्याचे संदेश पसरविले होते. पोलिसांनी ही माहिती मिळताच या दोघांना सापळा रचून अटक करण्यात आली. प्रकरणी यवत पोलिस ठाण्यात गुन्हादेखील नोंदविण्यात आला. या बातमीचा व्हिडियो खाली पाहा.
यावरून हे सिद्ध होते की, ही बातमी सात महिन्यांपूर्वीची आहे. तसेच राहुल कुल यांच्यावर प्राणघातक हल्ला किंवा तसा प्रयत्नदेखील झाला नसून, कट रचल्याप्रकरणी दोघांना जेरबंद करण्यात आले.
फॅक्ट क्रेसेंडोने पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आम्हाला या घटनेचा तपास सुरू असल्याचे सांगितले.
मग ही सात महिन्यांपूर्वीची बातमी आता का पसरविली जात आहे?
बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल लोकसभेची निवडणूक लढवित आहेत. या पार्शवभूमीवर जुन्या बातमीला राजकीय रंग देण्यात येत आहे.
निष्कर्ष
आमदार राहुल कुल यांच्या खुनाचा कट उघड झाल्याची बातमी सात महिन्यांपूर्वीची आहे. या जुन्या बातमीला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चुकीचे संदर्भ जोडून आणि Out of Context आता पसरविले जात आहेत. त्यामुळे ही पोस्ट असत्य आहे.

Title:READ TRUTH: आमदार राहुल कुल यांच्या खूनाच्या कटाची जूनी बातमी चुकीच्या दाव्यासह व्हायरल
Fact Check By: Mayur DeokarResult: False
