केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नुकताच संसदेत अर्थसंकल्प मांडला. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या याविषयी जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, निर्मला सीतारमण यांचा एका ज्येष्ठ व्यक्तीशी बोलतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोबत दावा केला जात आहे की, ती व्यक्ती सीतारमण यांचे वडिल आहेत.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, ही व्यक्ती सीतारमण यांचे वडिल नाहीत.

काय आहे दावा ?

व्हिडिओमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण एका ज्येष्ठ व्यक्तीच्या शेजारी बसून बोलत आहेत. युजर्स लिहितात की, “भारताच्या अर्थमंत्री निर्मला सिताराम वडिलांना त्यांच्या घरी (माहेरी) भेटतात, बघा घरची अवस्था.”

मूळ पोस्ट -- फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

कीवर्ड सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओमधील घर निर्मला सीतारमण यांचे माहेर नाही.

निर्मला सीतारामण यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर 3 डिसेंबर 2022 रोजी हाच व्हिडिओ शेअर केला होता. त्यासोबत दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ वाराणसीच्या Siva Madam येथील आहे. तेथे महाकवी भरथियार 1900 साली वाराणसीला आले होते.

तसेच इंस्टाग्रामवर देखील हाच व्हिडिओ शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलेले आहे की, “काल वाराणसीमध्ये Siva Madam भेट दिली आणि महाकवी भारतियार यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला, ज्यात त्यांचे 96 वर्षांचे मोठे पुतणे श्री के.व्ही. कृष्णन यांचा समावेश होता.” सोबत त्यांनी #KashiTamilSangamam असे लिहिले होते.

‘काशी-तामिळ संगमम’

काशी आणि तामिळनाडूच्या संस्कृतीचा दोन्ही राज्यांकडून उत्सव साजरा केला जातो. जो ‘काशी-तमिळ संगमम’ म्हणून प्रसिद्ध आहे. हा उत्सव महिनाभर चालत असतो, तसेच तामिळनाडुतून मोठ्या संख्येने लोक वाराणसीमध्ये दाखल होतात. 3 डिसेंबर 2022 रोजी या केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामण यांनी या उत्सवासाठी हजेरी लावली होती.

आई - वडिल

निर्मला सीतारामन यांनी 2019 मध्ये पहिला अर्थसंकल्प सादर केला होता, तेव्हा त्यांचे वडिल नारायणन सीतरमण आणि आई सवित्री सीतारमण संसदेत आले होते. खालील फोटोमध्ये आपण त्यांना पाहू शकता.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हिडिओमधील ज्येष्ठ व्यक्ती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे वडिल नाहीत. ‘महाकवी भारतियार’ यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधतानाचा हा व्हिडिओ आहे. चुकीच्या दाव्यासह हा व्हिडिओ व्हियरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:व्हायरल व्हिडिओमधील व्यक्ती निर्मला सीतारमण यांचे वडिल नाहीत; वाचा सत्य

Fact Check By: Sagar Rawate

Result: False