
पाकिस्तानवरील हवाई हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानवर इथून पुढेही हल्ले सुरुच ठेवले तर भारताला याची मोठी किंमत मोजावी लागेल अशी धमकी तालिबाननं भारताला दिल्याचे वृत्त झी 24 तास या वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळाने दिले आहे. तालिबानचा प्रवक्ता झबिउल्लाह मुजाहिद याने ही धमकी दिल्याचे यात म्हटले आहे.

झी 24 तासने ही पोस्ट आपल्या फेसबुक पेजवर शेअर केली आहे. या पोस्टला 5 हजार 500 लाईक्स आहेत. हे वृत्त 80 जणांनी शेअर केले आहे. यावर 118 जणांनी कमेंटस दिल्या आहेत.
तथ्य पडताळणी
तालिबानचा प्रवक्ता झबिउल्लाह मुजाहिद याने स्वत:च आपण भारत पाकिस्तान संबंधावर कोणतेही वक्तव्य केले नसल्याचे स्पष्ट केले आहे. रॉयटर या वृत्तसंस्थेकडे त्याने याबाबतचा खुलासा केला आहे.

द टाईम्स ऑफ इंडियाच्या संकेतस्थळानेही हे वृत्त दिले आहे. रॉयटरच्या हवाल्याने त्यांनी तालिबानचा प्रवक्ता झबिउल्लाह मुजाहिद याने कोणतेही पत्रक काढले नसल्याचे स्पष्ट केले आहे.

अफगाणिस्तानमधील http://www.1tvnews.af या संकेतस्थळानेही तालिबानने आपण भारत पाकिस्तान संबंधावर कोणतेही वक्तव्य केले नसल्याचे म्हटलं असल्याचे वृत्त दिले आहे.

निष्कर्ष
पाकिस्तानवरील हवाई हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानवर इथून पुढेही हल्ले सुरुच ठेवले तर भारताला याची मोठी किंमत मोजावी लागेल अशी धमकी तालिबाननं दिल्याचे कुठेही दिसून आलेले नाही. भारत आणि पाकिस्तानमधील तणावाचा अफगाणिस्तानातील शांतता प्रक्रियेवर प्रभाव पडू शकतो, असे रॉयटरने दिलेले वृत्तही तालिबानच्या प्रवक्त्याने आपण दिलेले नसल्याचे म्हटले आहे. फॅक्ट क्रिसेन्डोच्या तथ्य पडताळणी हे वृत्त तथ्यहीन असल्याचे दिसून आले आहे.

Title:सत्य पडताळणी: दहशतवादी संघटना तालिबानची भारताला धमकी
Fact Check By: Dattatray GholapResult: False
