
महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय इतिहासातील थोर व्यक्ती आहेत. दोघेही समकालीन होते. एक स्वातंत्र्य लढ्याचे सेनानी तर, दुसरे समाज सुधारणेचे अग्रमी धुरीण. सोशल मीडियावर या दोहोंसंबंधी एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये महात्मा गांधी यांना डॉ. आंबेडकरांच्य पाया पडताना दाखविण्यात आले आहे. सदरील फोटोद्वारे दावा केला जात आहे की, गांधीजी आंबेडकरांचा आशीर्वाद घेतानाचा हा दुर्मिळ फोटो आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोची पडताळणी केली.
पोस्टमध्ये दिलेल्या फोटोमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर झाडाखाली एका ओट्यावर बसलेले आहेत. त्यांच्यासोबत एक महिला आणि आणखी एकजण आहे. तसेच गांधीसदृश्य एक व्यक्ती आंबेडकरांचे पाया पडताना दिसते. सोबत लिहिले की, गांधीजी बाबा साहिब के पांव छुते हुए. ये फोटो आपको कही नहीं मिलेगी. फैलाओ.
तथ्य पडताळणी
सदरील फोटोला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर पिंटरेस्टया वेबसाईटवरील एक फोटो समोर येतो. पोस्टमधील फोटोसारखाच आहे. परंतु येथे गांधीजी पाया पडताना दिसत नाहीत. अलामी ही छायाचित्र संग्रहित करणारी वेबसाईट आणि विकिमीडिया कॉमन्सवरील माहितीनुसार या मूळ फोटोमध्ये बाबासाहेब आंबेडकर, त्यांच्या द्वितीय पत्नी सविता, सेवक सुदामा आणि पाळीव कुत्रा दिसतो.

मूळ छायाचित्र येथे पाहा – अलामी । विकिमीडिया कॉमन्स
म्हणजे मूळ छायाचित्रामध्ये छेडछाड करण्यात आली आहे. गांधीजी यांनी 12 मार्च 1930 रोजी मीठाचा सत्याग्रह करण्यासाठी दांडी यात्रा सुरू केली होती. यादरम्यान एप्रिल, 1930 मध्ये खालील फोटो काढण्यात आला होता.

मूळ छायाचित्र येथे पाहा – दांडी यात्रा
आता मूळ फोटो आणि पोस्टमधील फोटोची तुलना करून पाहू.

निष्कर्ष
बाबासाहेब आणि सविता आंबेडकर यांच्या मूळ छायाचित्रामध्ये छेडछाड करून महात्मा गांधी यांना पाया पडताना दाखविण्यात आले आहे. त्यामुळे ही पोस्ट असत्य आहे.

Title:महात्मा गांधी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पाया पडले होते का? जाणून घ्या या फोटो मागचे सत्य
Fact Check By: Mayur DeokarResult: False
