एका व्हिडिओद्वारे दावा केला जात आहे की, जवाहरलाल नेहरू यांनी एका मुलाखतीमध्ये मान्य केले होते की, स्वातंत्र्यलढ्यात त्यांचा सहभाग नव्हता

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ एडिटेड आहे. पंडित जवाहरलाल नेहरू हे मोहम्मद अली जिन्नांबद्दल बोलत होते.

काय आहे दावा ?

व्हिडिओमध्ये जवाहरलाल नेहरू सांगतात की, “स्वातंत्र्यलढ्यात माझा अजिबात सहभाग नव्हता. उलट मी विरोध केला होता. मुस्लिम लीगची सुरुवात साधारण 1911 मध्ये झाली होती, याची सुरुवात खऱ्या अर्थाने इंग्रजांनी केली होती, त्यांना प्रोत्साहन देऊन दुफळी (विभागणी) निर्माण केली आणि काही प्रमाणात ते यशस्वी झाले.” (भाषांतर)

युजर्स हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहितात की, “स्वातंत्र्यलढ्यात माझा अजिबात सहभाग नव्हता. उलट मी विरोध केला – नेहरू जी.” (भाषांतर)

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

पश्चिम बंगालच्या भाजप प्रवक्ता माधवी अग्रवाल यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला.

मूळ पोस्ट – ट्विटर | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ एडिट केलेला आहे.

प्रसार भारती आर्काइव्हच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर या मुलाखतचा संपूर्ण व्हिडिओ 14 मे 2019 रोजी अपलोड करण्यात आला होता.

व्हिडिओसोबत दिलेल्या माहितीनुसार ही मुलाखत 18 मे 1964 रोजी अमेरिकन टीव्ही होस्ट अर्नोल्ड मायकेलिस यांनी घेतली होती. ही पंडित जवाहरलाल नेहरू यांची शेवटची मुलाखत होती. या मुलाखतीच्या काही दिवसानंतर 27 मे 1964 रोजी पंडित नेहरू यांचे निधन झाले होते.

https://youtu.be/zlTfXWFQYGQ?si=eJILTOC6bJ9a-gy5&t=867

वरील व्हिडिओमध्ये 14:30 मिनिटापासून अर्नोल्ड मायकेलिस नेहरूंना प्रश्न विचारतात की, स्वातंत्र्यापूर्वी आपण, गांधी आणि जिन्ना सर्व मिळून ब्रिटिशांविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले होते.

त्यावर जवाहरलाल नेहरू उत्तर देतात की, जिन्ना स्वातंत्र्यलढ्यात कधीच सहभागी नव्हते. हे सत्य असून उलट त्यांनी याचा विरोध केला होता. माझ्या आठवणीनुसार मुस्लिम लीगची सुरुवात साधारण 1911 मध्ये झाली होती, याची सुरुवात खऱ्या अर्थाने इंग्रजांनी केली होती, त्यांना प्रोत्साहन देऊन दुफळी (विभागणी) निर्माण केली आणि काही प्रमाणात ते यशस्वी झाले. शेवटी देशाची फाळणी झाली.”

पुढे अर्नोल्ड मायकेलिस त्यांना विचारतात की, आपण आणि गांधी याच्या बाजूने होता का?

नेहरू प्रत्युत्तर देतात की, “गांधीजी मरेपर्यंत या निर्णयाच्या बाजूने नव्हते. हे घडत असतानाही त्यानी याच्या बाजू घेतली नव्हती. मी स्वतःदेखील या निर्णयाच्या बाजूने नव्हतो. पण सरतेशेवटी, इतरांप्रमाणे, मी ठरवले की सतत त्रास होण्यापेक्षा विभाजन चांगले आहे. मुस्लिम लीगसोबत मोठ-मोठे जमीनदार होते हे तुम्हा सर्वांना माहीत आहे. जे जमीन सुधारणांच्या विरोधात होते. दुसरीकडे, आम्हाला सुधारणा करायच्या होत्या, ज्यात आम्ही नंतर यशस्वी झालो. त्यामुळेच आम्ही फाळणीला सहमती दर्शवली, कारण आम्हाला वाटले की या सर्व गोष्टींमुळे आम्हाला काम करण्यात अडचणी निर्माण होतील. देशात सुधारणाची कामे होत राहावी आणि हे नेते आपल्या कामापुढे अडथळे निर्माण करू शकत नयेत म्हणून फाळणी झाली तर बरे होईल, असे आम्हाला वाटले.”

ही क्लिप पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, व्हिडिओला एडिट करून नेहरूंच्या उत्तरात 'जिन्ना'चा उल्लेख हटवून त्या ठिकाणी मी (I) शब्द जोडण्याच आला होता.

https://youtu.be/StmZ4wLp1O4?si=uVvl-9nqzMN6nDke

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ बनावट असून मूळात जवाहरलाल नेहरू हे ‘मोहम्मद अली जिन्ना’ बद्दल बोलत होते. खोट्या दाव्यासह हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:जवाहरलाल नेहरूंनी स्वातंत्र्यलढ्यात भाग न घेतल्याचा दावा करणारा व्हिडिओ बनावट; वाचा सत्य

Fact Check By: Sagar Rawate

Result: Altered