
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा पंतप्रधानांवर टीका करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्याद्वारे दावा केला जात आहे की, नितीन गडकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात पत्रकार परिषद घेतली.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉट्सअॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून त्याच्या सत्यतेबाबत विचारणा केली.
पडताळणीअंती कळाले की. व्हायरल व्हिडिओ जुना असून चुकीच्या माहितीसह शेअर केला जात आहे.
काय आहे दावा?
व्हायरल व्हिडिओमध्ये नितीन गडकरी पत्रकारांशी बोलताना म्हणातात की, “पंतप्रधानांचे वक्तव्य संविधानाच्या विरोधात आहे. भ्रष्ट नेते व सरकारविरोधात आंदोलन करणे हा जनता व विरोधी पक्षाचा सांविधानिक अधिकार आहे. हा अधिकार काँग्रेस किंवा पंतप्रधानांनी दिलेला नाही?”
या व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये म्हटले की, “नितीन गडकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात पत्रकार परिषद घेतली.”
तथ्य पडताळणी
नितीन गडकरी यांनी खरंच मोदींवर टीका केल्याचा हा व्हिडिओ आहे का याचा शोध घेतला. कीवर्ड्सद्वारे सर्च केल्यावर कळाले की, हा व्हिडिओ सुमारे दहा वर्षे जुना आहे.
भाजपच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर 15 ऑगस्ट 2011 रोजी अपलोड केलेला व्हिडिओ आढळला. म्हणजेच हा व्हिडिओ आताचा नाही.
16 ऑगस्ट 2011 रोजी अण्णा हजारे लोकपाल बिलासाठी उपोषणास बसणार होते. तत्पूर्वी 15 ऑगस्टच्या भाषाणात तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्याला विरोध दर्शविला होता. सिंग यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत असतानाचा हा व्हिडिओ आहे.
हिंदूस्तान टाईम्सच्या बातमीनुसार लाल किल्ल्यावर केलेल्या भाषणात मनमोहन सिंग म्हणाले होते की, लोकपाल बिलाविषयी ज्यांना तक्रार आहे त्यांनी ती संसदेसमोर किंवा एखाद्या राजकीय पक्षाकडे किंवा माध्यमांकडे मांडावी. त्यांच्या मागणीसाठी असे उपोषण आंदोलन करणे योग्य नाही.
सिंग यांच्या या वक्तव्यावरून टीका झाली होती. तत्कालिन भाजपचे अध्यक्ष नितीन गडकीरसुद्धा त्यावरच प्रतिक्रिया देत होते. ते मनमोहन सिंग यांना उद्देशून बोलत होते.
निष्कर्ष
यावरुन स्पष्ट होते की, व्हायरल व्हिडिओ एक तर जुना आहे. 15 ऑगस्ट 2011 रोजीच्या या व्हिडिओमध्ये नितीन गडकरी तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर टीका करीत आहेत. चुकीच्या माहितीसह हा व्हिडिओ शेअर करीत आहेत.

Title:नितीन गडकरी यांनी पंतप्रधान मोदींविरोधात पत्रकार परिषद घेतली का? वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: Misleading
