नदीत गेल्यामुळे दलित महिलेला मारहाण झाल्याचा हा व्हिडिओ नाही; वाचा सत्य

Social दिशाभूल करणाऱ्या I Misleading

नदीकाठी एका महिलेला तीन ते चार पुरुष मारत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, ही महिला दलित असून तिने नदीत आंघोळ केल्यामुळे भाजप व संघाच्या कार्यकर्त्यांनी तिला बेदमपणे मारहाण करण्यात आली.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून याबाबत सत्यता विचारली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल दावा खोटा आहे. हा व्हिडिओ कौटुंबिक वादातून झालेल्या मारहाणीचा असून, या प्रकरणाला जातीवादाची पार्श्वभूमी नव्हती.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये काही पुरुष एका महिलेला काठी, लाथा, बुक्क्यांनी मारहाण करताना दिसतात. यावेळी तिला वाचवण्यासाठी कोणी आले नाही. 

व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, “उत्तर प्रदेश राज्यातील एका गावी नदीमध्ये दलित समाजातील तरुणीने आंघोळ केली. त्यामुळे नदीचे पावित्र्य खराब झाले म्हणून, आर.एस.एस./बी.जे.पी.शी संलग्न असलेल्या हिंदुत्ववादी गुंडांनी त्या असहाय्य गरीब दलित तरुणीस लाथांनी व काठीने अमानुषपणे बेदम मारहाण केली.”

Archive

मुळ पोस्ट — फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

कीव्हडर्स सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओमधील घटना मध्य प्रदेशमधील आहे. 

दैनिक भास्करनुसार ही घटना 22 जून 2021 रोजी मध्य प्रदेशमधील पिपलवा गावातील (जि. धार) आहे. तेथील दोन बहिणींना त्यांच्याच कुटुंबातील सदस्यांनी बेदम मारहाण केली होती. या दोन्ही बहिणी त्यांच्या मामाच्या मुलाशी मोबाईलवर बोलत असल्याचे कळाल्यावर या मुलींचे चुलत भाऊ व इतर नातेवाईकांनी त्यांना मारले होते. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण समोर आले होते. पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांना अटक केली होते. 

फॅक्ट क्रेसेंडोने टांडा पोलिस ठाण्याचे प्रमुख विजय वास्कले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणात जातीवादाचे कारण नसल्याचे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, ही घटना दोन वर्षांपूर्वीची आहे. अधुनमधून हा व्हिडिओ जातीवादाच्या असत्या दाव्यासह व्हायरल होत असतो. या महिलांना दलित असल्यामुळे मारहाण झाली नव्हती. दोन्ही महिला आदिवासी असून त्यांनी मामे भावाला बोलणे त्यांच्या कुटुंबाला मान्य नव्हते. ते कळाल्यावर त्यांनी त्यांना मारहाण केली होती. पोलिसांनी कारवाई करत आरोपींना तत्काळ अटक केली. 

हा व्हिडिओ उत्तर प्रदेशमधील म्हणून जेव्हा व्हायरल होऊ लागला तेव्हा उत्तर प्रदेश पोलिसांच्या फॅक्ट चेक ट्विटर अकाउंटवरून या व्हिडिओ संबंधित स्पष्टीकरण जारी करण्यात आले होते. 

“हा व्हिडिओ मध्य प्रदेशमधील धार जिल्हाच्या टांडा या पोलिस स्टेशन अंतर्गत पिपलवा या गावातील आहे.”

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओमध्ये दलित महिलेला नदीपात्रात आंघोळ केल्यामुळे मारहाण करण्यात आली नव्हती. कौटुंबिक वादातून या महिलांना त्यांच्याच नातेवाईकांनी मारले होते. कौटुंबिक भांडणाचा व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:नदीत गेल्यामुळे दलित महिलेला मारहाण झाल्याचा हा व्हिडिओ नाही; वाचा सत्य

Fact Check By: Sagar Rawate 

Result: Misleading