
सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये एक हत्ती जमिनीवर पडलेला असून त्याच्यावर फुल आणि हार चढवलेले आहेत. दावा केला जात आहे की, व्हायरल फोटोमधील हत्ती उज्जैनच्या महाकाल मंदिराचा असून नुकताच त्याचा मृत्यू झाला.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, उज्जैनच्या महाकाल मंदिरामध्ये हत्ती वारल्याची बातमी सध्याची नाही. भ्रामक दाव्यासह जुनी बातमी व्हायरल होत आहे.
काय आहे दावा ?
युजर्स हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “अनेक वर्षांपासून महाकाल महाराजांच पालखीचे उज्जैन मध्ये भ्रमण करावयास तत्पर असलेल्या रामू हत्ती ने घेतला आज अंतिम श्वास.”

मूळ पोस्ट – फेसबुक
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल बातमी सात वर्षांपूर्वीची आहे.
नईदुनिया या वेबसाईटच्या बातमीनुसार 03 ऑक्टोबर 2016 रोजी उज्जैनमध्ये भगवान महाकालचे वाहन म्हणून काम करणाऱ्या ‘रामू’ या हत्तीचा पहाटे मृत्यू झाला. दुपारी माकसी रोडवरील नवलखी बीड येथे वनविभागाकडून रामूवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
मंदिर प्रशासनानुसार 60 वर्षांचा रामू हत्ती 25 वर्षांपासून तो महाकालचे वाहन म्हणून काम करत होता. गवतासह धातूचा तुकडा गिळल्याने रामू आजारी होता. त्याची प्रकृती चिंताजनक असताना चारधाम मंदिराजवळील मुलांच्या वसतिगृहात त्याच्यावर उपचार सुरू होते.

मूळ पोस्ट – नईदुनिया
पुढे फॅक्ट क्रेसेंडोने उज्जैच्या भगवान महाकाल मंदिराशी संपर्क साधल्यावर त्यांनी सांगितले की, “व्हायरल होत असलेला फोटो सध्याचा नसून सात वर्षांपूर्वीचा आहे. 2 ऑक्टोबर 2016 रोजी सकाळी त्याचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून रामूच्या जागी श्यामू हा हत्ती भगवान महाकालच्या स्वारीत सेवा देत आहे.”
उज्जैनमध्ये भोलेनाथ चंद्रमौलेश्वर यांची मुर्ती जेंव्हा दर्शनासाठी बाहेर काढली जाते, तेव्हा ती मूर्ती श्यामू हत्तीवर बसवली जाते. अनेक वर्षांपासून हत्तीवरून ही स्वारी काढली जात आहे.
मात्र आता पीपल फॉर अॅनिमल्स संस्थेचे सचिव प्रियांशू जैन यांनी बाबा महाकालच्या मिरवणुकीत काढण्यात आलेल्या श्यामू हत्तीवर क्रूरतेची तक्रार दाखल केली आहे.
मंदिर प्रशासनाने या आरोपाचे खंडन करताना सांगितले की, शहरातुन स्वारी निघत अलताना हत्तीने कधी ही कोणाला इजा पोहचवली नाही किंवा नुकसान केले नाही.
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, उज्जैनच्या महाकाल मंदिरामध्ये हत्ती वारल्याची बातमी सध्याची नसून 2016 सालची आहे. भ्रमक दाव्यासह फोटो व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:उज्जैनच्या महाकाल मंदिरामध्ये हत्ती वारल्याची जुनी बातमी व्हायरल; वाचा सत्य
Written By: Sagar RawateResult: Misleading
