
दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीमध्ये नेत्यांची एकमेकांवर टीका सुरू झाली आहे. सोशल मीडियावरील पोस्ट खऱ्या मानल्या तर विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना शह देण्यासाठी भाजपतर्फे एक अनोखा प्लॅन तयार केला आहे.
एका व्हायरल पोस्टनुसार, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी दिल्लीच्या सरकारी शाळांमध्ये मतदान केंद्र उभारण्यात येऊ नये, अशी मागणी केली. नाही तर लोकं मग सरकारी शाळांचा विकास पाहुन केजरीवाल यांनाच मत देतील, असे इराणी यांना वाटत असल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली असता कळाले की, ही एक फेक न्यूज आहे.
काय आहे पोस्टमध्ये?
पोस्टमध्ये ‘आज तक’ वाहिनेचे नाव असलेल्या ट्विटचा स्क्रीनशॉट दिलेला आहे. सोबत स्मृती इराणींचा फोटो देऊन लिहिलेले आहे की, “दिल्लीच्या सरकारी शाळांमध्ये पोलिंग बुथ करू नयेत. नाही तर दिल्लीचे लोक सरकारी शाळा पाहुन पुन्हा केजरीवाल यांनाच निवडूण देतीलः केंद्रीय मंत्री स्मृती इराणी” (मराठी भाषा)
पोस्टकर्त्याने कॅप्शन दिली की, स्मृतीबाई तुम्हीही केंद्रीय शिक्षा मंत्री होतात…कन्हैयाचे खोटे विडिओ बनवण्याऐवजी दिल्लीत 4-8 शाळा बांधल्या असत्या तर आज ही पाळी तुमच्यावर नसती आली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम स्मृती इराणी यांनी खरंच असं काही विधान केले का याचा शोध घेतला. इंटरनेटवरील बातम्यांमध्ये त्यांनी असे काही बोलल्याचे आढळले नाही. स्मृतीचे हे विधान नक्कीच मीडियामध्ये चर्चेत राहिले असते. पण तसे काही दिसले नाही. मग शोध पुढे नेला असता रेडिट वेबसाईटवर एक युजरने 19 जानेवारी सर्वप्रथम स्मृती इराणींच्या नावे हे वाक्य पोस्ट केल्याचे आढळले. म्हणजे स्मृती यांनी स्वतः असे म्हटल्याचे नोंद इंटरनेटवर नाही.
आजतक वाहिनीच्या अधिकृत ट्विटरवरदेखील शोध घेतला. परंतु, 18 जानेवारी 2019 रोजी केलेले असे कोणतेही ट्विट आढळले नाही.

आता ट्विटचे विश्लेषण करुयात. पोस्टमधील स्क्रीनशॉटचे नीट निरीक्षण केल्यावर दिसते की, ‘आज तक’ वृत्तवाहिनेचे नाव व लोगो असलेल्या ट्विटचे हँडल @aajTak51 आहे. तसेच हे व्हेरिफाईड (ब्लू टिक) अकाउंट नाही. ट्विटरवर या हँडलचा शोध घेतला असता कळाले की, हे अकाउंट आजतक वाहिनेचे नाही. हे अकाउंट निलंबित करण्यात आले आहे.

मूळ अकाउंटला भेट द्या: @aajTak51
‘आज तक’ या वाहिनेचे अधिकृत ट्विटर हँडल @aajtak या नावाने असून ते व्हेरिफाईड (ब्लू टिक) आहे. त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही खाली पाहू शकता.

मूळ अकाउंटला भेट द्याः आज तक
निष्कर्ष
यावरून हे सिद्ध होते की, स्मृती इराणी यांच्या नावे खोटे वक्तव्य पसरविण्यात येत आहे. ‘आज तक’ वाहिनीच्या नावे तसे बनावट ट्विट तयार करण्यात आले आहे. सदरील व्हायरल ट्विट फोटोशॉपद्वारे तयार करण्यात आले असून, त्यावर विश्वास ठेवू नये.

Title:दिल्लीच्या सरकारी शाळांत मतदान केंद्र न उभारण्याचे विधान स्मृती इराणी यांनी केलेले नाही. वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
