
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विदेशात प्रस्थ वाढत असल्याचे सांगत सोशल मीडियावर एका कथित सिंगापूरच्या वृत्तपत्रातील कात्रण फिरवले जात आहे. यामध्ये नरेंद्र मोदी यांची सिंगापूरचे संस्थापक नेते ली कुआन यू यांच्याशी तुलना केलेली आहे. अनेकांनी या दाव्याच्या सत्यतेबाबत शंका उपस्थित केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने मग याची पडताळणी केली.
काय आहे पोस्टमध्ये?
वर्तमानपत्राच्या कात्रणामध्ये नरेंद्र मोदी व ली कुआन यू यांचा फोटो देऊन मथळा दिला आहे की, “नरेंद्र मोदी भारतातील प्रति ली कुआन यू आहेत”. पोस्टकर्त्याने सोबत लिहिले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामगिरीचा डंका परदेशातही वाजत आहे. हे सिंगापूरमधील एका वर्तमानपत्राचे शीर्षक आहे. यात मोदींची तुलना ही ली कुआन यांच्याशी करण्यात आली आहे. ली कुआन यांनी सिंगापूरला एका लहानशा शहरातून आर्थिक महाशक्तीत रुपांतरित केले. भारत देशातील आंधळ्यांचे सोंग घेतलेल्या मोदी द्वेष्टयांनी हे जरुर वाचावे.” (मराठी भाषांतर)
तथ्य पडताळणी
सिंगापूरमधील वृत्तपत्राने नेमक्या वर्तमानपत्राने ही बातमी दिली हे शोधण्यासाठी विविध की-वर्ड्सद्वारे सर्च केले. परंतु, ठोस असे परिणाम समोर आले नाहीत. उलट या मथळ्याची बातमी भारतातील बिझनेस पेपर द इकोनॉमिक टाईम्समध्ये 10 नोव्हेंबर 2016 रोजी प्रसिद्ध झाल्याचे समोर आले. या बातमीचे शीर्षक आहे: “A New Lee Kuan Yew Born in India: Govt Source”
वरील बातमीमध्ये 8 नोव्हेंबर रोजी नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर भारतीय प्रशासन व उद्योगविश्वात याचे काय पडसाद उमटत आहेत यासंबंधी माहिती दिलेली आहे. सरकारच्या या अभूतपूर्व निर्णयाचे स्वागत करताना एका भारतीय सरकारी अधिकाऱ्याने इकोनॉमिक टाईम्सच्या वार्ताहराशी बोलताना मोदींची तुलना सिंगापूरचे पहिले पंतप्रधान ली कुआन यू यांच्याशी केली होती. ते म्हणाले होते की, सरकारने 8 नोव्हेंबर रोजी घेतलेल्या निर्णयामुळे भारतात नवे ली कुआन जन्माला आले आहेत. मोदी याद्वारे कुआन यांचा वारसा चालवत आहेत. त्यांच्या वक्तव्यालाच बातमीचे शीर्षक म्हणून दिले आहे.
मूळ बातमी येथे वाचा – द इकोनॉमिक्स टाईम्स । Archive
बातमीचे मूळ कात्रण पाहून लक्षात येते की, सोशल मीडियावर Govt Source हे शब्द एडिट करून बातमीचा स्क्रीनशॉट दिलेला आहे. यामुळे पेपरनेच मोदींची ली युआन यांच्याशी तुलना केल्याचे वाटते. परंतु, सत्य तसे नाही.
सिंगापूरच्या द इंडीपेडेट (अर्काइव्ह) नावाच्या स्थानिक वेबसाईटने इकोनॉमिक टाईम्सची हीच बातमी कोणताही स्रोत न देता प्रकाशित केली होती. त्यामध्येही भारतीय सरकारी अधिकाऱ्यानेच असेच म्हटल्याचे नमुद करण्यात आले आहे.
निष्कर्ष
पडताळणीतून स्पष्ट होते की, पोस्टमधील कात्रण सिंगापूरच्या पेपरचे नाही. हे कात्रण भारतातीलच इकोनॉमिक टाईम्स वृत्तपत्रातील आहे.. एका भारतीय अधिकाऱ्याने या पेपरशी बोलताना असे वक्तव्य केले होते. ते पेपरचे मत नाही. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत या पोस्टमधील दावा असत्य आढळला.

Title:Fact Check: सिंगापूरमधील वर्तमानपत्राने नरेंद्र मोदींची तुलना ली युआन यू यांच्याशी केली का?
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
