लोकसभा निवडणूकीचा निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीने जल्लोष साजरा करतांना काही लोकांनी श्रीरामपूरमधील वार्ड क्रमांक 2 वेस्टन चौकात भागात पाकिस्तानचा झेंडा फडकवण्यात आला, या दाव्यासह एक व्यक्ती हिरवा झेंडा हवेत फिरवताना दिसत आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमध्ये इस्लामिक झेंडा फडकवण्यात आला होता. पाकिस्तानचा ध्वज नाही.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये जल्लोष साजरा करतांना एक व्यक्ती हिरवा झेंडा हवेत फिरवताना दिसतो.

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “श्रीरामपूरच्या वार्ड क्रमांक 2 म्हणजे वेस्टन चौक भागात महाविकास आघाडीचा जल्लोष साजरा करतांना मुस्लिम समाजकंटकांनी पाकिस्तानचा झेंडा फिरवला.”

याच कॅप्शनसोबत सुदर्शन मराठीने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

मूळ पोस्ट – ट्विटर | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

व्हायरल व्हिडिओमधील हिरव्या झेंड्याचे निरीक्षण केल्यावर दिसते की, त्यावर अर्धचंद्र, एक मोठा पंचमुखी तारा व अनेक लहान पंचमुखी तारे आहेत.

अधिक सर्च केल्यावर कळाले की, व्हिडिओमधील हिरवा झेंडा इस्लामिक ध्वज आहे.

मूळ पोस्ट – फ्लिपकार्ट

पाकिस्तान दूतावासच्या वेबसाईटवर दिलेल्या महितीनुसार पाकिस्तानचा राष्ट्रीय ध्वज गडद हिरवा रंगाचा असतो, ज्यामध्ये पांढरी उभी पट्टी असते, एक पांढरा अर्धचंद्र आणि मध्यभागी एक पंचमुखी तारा असतो. परंतु, या ठिकाणी कुठे ही लहान ताऱ्यांचा उल्लेख केलेला नाही.

मूळ पोस्ट – पाकिस्तान दूतावास

खालील तुलनात्मक फोटो पाहिल्यावर आपल्याला इस्लामिक आणि पाकिस्तानच्या ध्वजमधील फरक लक्षात येईल.

शिर्डी मतदारसंघ

श्रीरामपूर हा भाग शिर्डी लोकसभा मतदारसंघात येतो. या ठिकाणावरून महाविकास आघाडी भाग असलेला पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब राजाराम वाकचौरे निवडून आले आहे. संपूर्ण बातमी येथे वाचू शकता.

या पुर्वीदेखील शिवसेना उबाठा गटाचे अनिल देसाई प्रचार रॅलीमध्ये पाकिस्तानाचा झेंडा फडकविण्यात आला, या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल झाला होता.

परंतु, फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीअंती कळाले की, त्या व्हिडिओमध्ये इस्लामिक झेंडा दाखवण्यात आला होता. पाकिस्तानचा ध्वज नाही. संपूर्ण फॅक्ट-चेक येथे वाचू शकता.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओमध्ये इस्लामिक झेंडा दाखवण्यात आला असून तो पाकिस्तानचा ध्वज नाही. भ्रामक दाव्यासह हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:महाविकास आघाडीचा जल्लोष साजरा करताना श्रीरामपुरमध्ये पाकिस्तानचा झेंडा फडकविण्यात आला का ? वाचा सत्य

Written By: Sagar Rawate

Result: Misleading