पाकिस्तानच्या झेंड्यासोबत राखी सावंतचे फोटो चित्रपटाच्या सेटवरील आहेत; वाचा सत्य

Missing Context सामाजिक

अभिनेत्री राखी सावंत आणि वाद हे जणू काही समीकरणच आहे. विविध कारणांसाठी सोशल मीडियावर चर्चेत राहणाऱ्या राखीचे पाकिस्तानी झेंड्यासोबतचे फोटो शेयर करून तिला पाकिस्तान धार्जिण म्हणून टीका केली जात आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हे फोटो चित्रपटाच्या सेटवरील असल्याचे समोर आले. ते तिच्या खऱ्या आयुष्यातील नाहीत.

काय आहे दावा

राखी सावंत पाकिस्तानी झेंडा घेऊन उभी असलेले फोटो शेयर करून एकाने कॅप्शनमध्ये म्हटले की, गद्दार लोकं फक्त भारतात मिळतात. काँग्रेसने कधी अशा लोकांवर प्रश्न उपस्थित केले नाहीत. हे लोकं भारतात खातात आणि पाकिस्तान व चीनचे गुणगाण करतात. राखी सावंत तुला आणखी किती आझादी हवी?

दुसऱ्या युजरने म्हटले की, ही तिच राखी सावंत आहे जी पाकिस्तानी झेंड्यावर इतकं प्रेम करते आणि कंगना रणौतचा विरोध करते.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी 

सर्वप्रथम या फोटोंना गुगल रिव्हस् इमेज सर्च केले. त्याद्वारे युट्यूबवरील एक व्हिडियो सापडला. तो व्हिडियो ‘बॉलीवूड फझ’ या चॅनलने 9 मे 2019 रोजी शेयर केला होता. त्यानुसार कळते की, ‘धारा 370’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान घेतलेले हे फोटो आहेत. 

हा धागा पकडून अधिक शोध घेतला असता राखी सावंत हिने स्वतःहून हे फोटो इन्स्टाग्रामवर शेयर केल्याचे आढळले. 8 मे 2019 रोजी तिने पाकिस्तानी झेंड्यासोबतचा फोटो शेयर करून म्हटले होते की, “मला माझ्या भारताविषयी प्रेम आहे. पण ‘धारा 370’ चित्रपटातील भूमिकेचा हा फोटो आहे.”

मूळ पोस्ट येथे पाहा – इन्स्टाग्राम

राखी सावंतचा हा फोटो तेव्हादेखील वादग्रस्त ठरला होता. त्यावर टाईम्स ऑफ इंडियाने बातमीसुद्धा केली होती. त्यातही स्पष्ट म्हटले आहे की, तिच्या ‘धारा 370’ चित्रपटाच्या सेटवरील हे फोटो आहेत. चित्रपटात ती पाकिस्तानी मुलीची भूमिका साकरत आहे.

निष्कर्ष 

यावरून स्पष्ट होते की, राखी सावंत हिच्या चित्रपटातील फोटो चुकीच्या दाव्यासह पसरविले जात आहेत. तिचे पाकिस्तानी झेंड्यासोबतचे फोटो हे चित्रपटाच्या सेटवरील आहेत.

Avatar

Title:पाकिस्तानच्या झेंड्यासोबत राखी सावंतचे फोटो चित्रपटाच्या सेटवरील आहेत; वाचा सत्य

Fact Check By: Milina Patil 

Result: Missing Context