अंबानींच्या पार्टीत टिश्यू पेपर्स म्हणून 500 रुपयांच्या नोटा वापरल्या होत्या का ? वाचा सत्य

Social दिशाभूल करणाऱ्या I Misleading

नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्राच्या उद्घाटनाचा कार्यक्रम ३१ मार्च रोजी मुंबईत पार पडला. या कार्यक्रमामध्ये हॉलिवूड आणि बॉलिवूडचे सेलेब्रिटी यांच्यासह राजकीय नेतेदेखील उपस्थित होते. सध्या सोशल मीडियावर या कार्यक्रमाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

या पार्श्वभूमीवर ‘लोकपत्र’ या वृतपत्राने दावा केला की, या कार्यक्रमात 500 रुपयांच्या नोटा टिश्यू पेपर म्हणून वापरण्यात आल्या. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही बातमी आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटोमधील नोटा खोट्या आहेत. “दौलत की चाट” या नावाच्या खाद्यपदार्थाला असे खोट्या नोटांनी सजवले जाते.

काय आहे दावा ?

‘लोकपत्र’ या वृतपत्राने लेखासोबत एका खाद्यपदार्थासोबत नोटांचा फोटो आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नीचा फोटो दिलेला आहे.

लेखाच्या शीर्षकात लिहिले आहे की, “माज मस्ती मुजोरी ! अंबानींच्या पार्टीत टिश्यू पेपर्स म्हणून 500 रुपयांच्या नोटांचा गैरवापर”

या लेखात लिहिलेले आहे की, “नीता अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटन सोहळ्यात शाही मेजवानीच्या वेळी अभ्यागतांना हात पुसण्यासाठी टिश्यु पेपर्सच्या ऐवजी चक्क भारतीय चलनातील 500 रुपयांच्या नोटा ठेवण्यात आल्या होत्या. या नोटावर महात्मा गांधींचे फोटो, रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरची स्वाक्षरी, त्रिमूर्ती सिंह, लाल किल्ला आहे. त्याला तुम्ही खरकटे हात पुसणार. त्यासाठी मोदी त्यांच्या मित्राला काही शिक्षा करणार का ?”

मुळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

कीव्हडर्स सर्च केल्यावर कळाले की, 2 एप्रिल रोजी रतनिश नावाच्या व्यक्तीनेदेखील ट्विट करून दावा केला होता की, अंबानी यांच्या पार्टीमध्ये टिश्यू पेपरच्या जागी 500 रुपयांच्या नोट वापर केला गेला होता.

परंतु, याच पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये @Althaf_tesla369 या अकाउंट वरून सांगण्यात आले की, या खाद्यपदार्थाचे नाव “दौलत की चाट” आहे.

हा धागा पकडुन अधिक माहिती मिळवल्यावर कळाले की, हा पदार्थ दुधाला फेटून तयार केला जातो. अनेक हॉटेलमध्ये “दौलत की चाट” खाद्यपदार्थाच्या सजावटीसाठी खोट्या नोटांचा वापर केला जातो. तसेच ही चाट दिल्लीमध्ये फार लोकप्रिय आहे. अधिक माहिती आपण इथे पाहू शकतात.

या आधी देखील अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांनी 2019 मध्ये “दौलत की चाट” या खाद्यपदार्था सोबत आपला एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला होता. संपूर्ण बातमी इथे वाचू शकतात.

500 रुपयांची नोट 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवर 500 रुपयाच्या नोटीचा नमुना दिलेला आहे.

खालील तुलनात्मक फोटो लक्षपुर्वक पाहिल्यावर आपल्याला फरक स्पष्ट कळतो.

वरील व्हायरल फोटोमधील नोटेवर लाल किल्याच्या उजव्या बाजूला मध्यभागी पांढऱ्या रंगात “500” ही संख्या आणि रुपयाचे चिन्ह “₹” असायला हवे होते परंतु, ती जागा रिकामी आहे.

तसेच नोटमधील लाल किल्याच्या वरच्या भागावर इंग्रजी अक्षरात “FIVE HUNDRED NUMBER” असे लिहिलेले आहे परंतु, आरबीआयच्या नियमानुसार अधिकृत 500 रुपयाच्या नोटेवर त्या ठिकाणी इंग्रजी अक्षरात “FIVE HUNDRED RUPEES” असे लिहिलेले असने अपेक्षित आहे.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, व्हायरल फोटोमधील 500 रुपयांच्या नोटा चलनातील नसून त्या खोट्या आहेत. नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रच्या उद्घाटन समारंभात “दौलत की चाट” या खाद्यपदार्थाला खोट्या नोटांनी सजवलेले होते. चुकीच्या दाव्यासह फोटो व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:अंबानींच्या पार्टीत टिश्यू पेपर्स म्हणून 500 रुपयांच्या नोटा वापरल्या होत्या का ? वाचा सत्य

Fact Check By: Sagar Rawate 

Result: Misleading