संत गाडगे महाराजांचा खरा व्हिडियो म्हणून एक व्हिडियो सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये कथितरीत्या संत गाडगे महाराज एका मिनीबसवर उभा राहून लोकांना आवाहन करीत आहेत की, ते गेल्यानंतर त्यांचे पुतळे उभारू नका. त्यांना संत, बाबा किंवा महाराज म्हणून त्यांचे उदात्तीकरण करून नका, असा संदेश ते देतात. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडियो व्हॉट्सअ‍ॅपवर (9049043487) पाठवून याची पडताळणी करण्याची विनंती केली.

काय आहे व्हिडियोमध्ये?

मूळ व्हिडियो येथे पाहा – फेसबुकफेसबुकफेसबुक

तथ्य पडताळणी

आधुनिक मराठी संत व समाजसुधारक गाडगे महाराज यांनी ग्रामस्वच्छतेसाठी मोठे काम केले. त्यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 शेणगाव (जि. अमरावती ) येथे झाला होता. त्यांचे मूळ नाव डेबूजी असे होते. अंगावर फाटकी गोधडी आणि हातात गाडगे असा असल्यामुळे लोक त्यांना ‘गोधडे महाराज’ किंवा ‘गाडगे महाराज’ म्हणूनच ओळखत. समाजातील कमालीचे अज्ञान, अनिष्ट चालीरीती व अंधश्रद्धा पाहून त्यांनी निरपेक्ष लोकसेवेचे व लोकशिक्षणाचे व्रत स्वीकारले. प्रवास करीत असता अमरावतीजवळ त्यांचे 20 डिंसेंबर 1956 निधन झाले. त्यांची समाधी अमरावती येथे आहे.

त्यांच्याविषयी अधिक सविस्तर येथे वाचा – मराठी विश्वकोश

सदरील व्हिडियोचे नीट निरीक्षण केल्यावर लक्षात येते की, ज्यापद्धतीने चित्रिकरण झाले आहे त्यावरून हा एखाद्या चित्रपटातील सीन असावा. तसेच व्हिडियोमध्ये ऐकू येणारा आवाज लोकप्रिय अभिनेते श्रीराम लागू यांच्याशी साम्य असणारा आहे. व्हिडियोमध्ये PRISM हा लोगोदेखील आहे. या सगळ्या बाबींचा विचार करून गुगलवर संत गाडगे महाराजांवर आधारित चित्रपटांचा शोध घेतला. त्यातून कळाले की, हा व्हिडियो “देवकी नंदन गोपाला” (1977) चित्रपटातील आहे. PRISM Video  च्या युट्यूब चॅनेलवर हा चित्रपट उपलब्ध आहे. व्हिडियोच्या 2 तास 23 मिनिट 48 सेकंदापासून हा व्हिडियो तुम्ही पाहू शकता.

डॉ. श्रीराम लागू यांनी या चित्रपटात गाडगे महाराजांची मुख्य भूमिका साकारली होती. राजदत दिग्दर्शित हा चित्रपट 1977 साली रिलीज झाला होता. गो. नी. दांडेकरांनी पटकथा लिहिली होती तर, ग. दि. माडगुळकर यांचे संवाद होते. या चित्रपटाला दादासाहेब फाळके पुरस्कार आणि फिल्मफेयर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून गौरविण्यात आले होते.

निष्कर्ष

यावरून लक्षात येईल की, गाडगेबाबांचा खरा व्हिडियो म्हणून जी क्लिप व्हायरल होत आहे ती मूळात त्यांच्या जीवनावर आधारित “देवकी नंदन गोपाला” (1977) चित्रपटातील एक सीन आहे. डॉ. श्रीराम लागू यांनी या चित्रपटात गाडगे बाबांची भूमिका साकारली होती.

Avatar

Title:हा संत गाडगेबाबांचा खरा व्हिडियो नाही. तो चित्रपटातील एक सीन आहे. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar

Result: False