सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचे आजोबा गंगाधर नेहरू हे मुस्लिम होते, असा दावा करण्यात येत आहे. गंगाधर नेहरू यांचे मूळ नाव गयासुद्दीन गाझी होते, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची सत्य पडताळणी केली.
फेसबुक पोस्टमध्ये नेहरू वंशावळीचा फोटो दिला आहे. या वंशावळचे प्रमुख गयासुद्दीन गाझी (गंगाधर नेहरू) आहेत. ते मुस्लिम असल्याने नेहरू कुटुंबातील इतर सदस्य “नकली हिंदू” असल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे. फोटोखाली लिहिले की, मुस्लीम– ईसाई परिवार देश के हिंदुओको मुर्ख बना रहा है।
सत्य पडताळणी
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल माहिती शोधली. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या नेहरू पोर्टल वेबसाईटवर पंडित जवाहरलाल यांची वंशावळ (फॅमिली ट्री) देण्यात आली आहे. त्यानुसार, पं. जवाहरलाल यांच्या आजोबांचे नाव गंगाधर नेहरू होते. येथे गयासुद्दीन गाझी असे नाव दिलेले नाही.
भारत डिस्कव्हरी वेबसाईटवर दिलेल्या माहितीप्रमाणे पंडित जवाहरलाल नेहरू काश्मीरी ब्राम्हण होते. वेबसाईटवरील माहितीनुसार त्यांचे वडिल मोतीलाल नेहरू यांचा जन्म एका कश्मीरी पंडित कुटुंबात झाला होता. म्हणजेचे नेहरूंचे आजोबा काश्मीरी पंडित होते.
मग गंगाधर नेहरू कोण होते?
M. Chalapathi Rau यांनी लिहिलेल्या नेहरू फॉर चिल्ड्रन (1967) या पुस्तकातील माहितीनुसार, गंगाधर नेहरू काश्मीरमधून दिल्लीत आले होते. नेहरू हे काश्मीरी ब्राह्मण होते. शेवटचा मुघल सम्राट बहादुर शाह द्वितीय यांच्या साम्राज्यात दिल्लीचे कोतवाल (पोलीस प्रमुख) होते. नंतर मुघल साम्राज्याच्या अस्तानंतर ते दिल्लीहून कुटुंबासह आग्रा येथे गेले. मोतीलाल नेहरू यांच्या जन्मापूर्वीच (1861) ते वारले. त्यामुळे ते मुस्लिम किंवा त्यांचे नाव गयासुद्दीन गाझी नव्हते.
नेहरु फॉर चिल्ड्रन । अर्काईव्ह
पोस्टमध्ये देण्यात आलेल्या वंशावळीचे बारकाईने निरीक्षण केल्यानंतर विसंगती आढळली. संजय गांधी यांना नकली हिंदू म्हटले आहे. तरीदेखील त्यांचा मुलगा हिंदू असल्याचे म्हटले आहे. त्यांची आई शीख आहे. शीख आणि हिंदू हे दोन वेगळे धर्म आहेत.
निष्कर्ष : केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या माहितीनुसार पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या आजोबांचे नाव गंगाधर नेहरू असेच होते. ते कश्मीरी ब्राह्मण होते. त्यांचे मूळ गयासुद्दीन गाझी किंवा ते मुस्लिम नव्हते. त्यामुळे सोशल मीडियावरील पोस्ट असत्य आहे.

Title:FACT CHECK: पं. जवाहरलाल नेहरू यांचे आजोबा मुस्लिम होते का?
Fact Check By: Amruta KaleResult: False
