
रात्री स्मशानातून फिरताना कबरीमधून प्रेत ओरडण्याचा आवाज येतोय, अशी कल्पना करणेच किती भीतीदायक आहे. नुसता विचार करूनच अंगावर शहारे येतात. आपल्यापैकी अनेकांनी जरी असा आवाज ऐकला नसेल, पण स्मशानातून विचित्र आवाज येण्याचे किस्से नक्कीच ऐकले असतील. सोशल मीडियावर एका व्हिडियोद्वारे या आवाजाचे कथित रहस्य उलगडल्याचा दावा केला जात आहे. स्मशानभूमीत राहणारा “कबर बिचू” नावाचा हा प्राणी हुबेहुब माणसासारखा किंचाळतो आणि त्याचा हा व्हिडियो असल्याचे सांगितले जाते. फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडियोची पडताळणी केली.
मूळ पोस्ट येथे वाचा – फेसबुक । अर्काइव्ह
काय आहे पोस्टमध्ये?
फेसबुक पोस्टमध्ये 15 सेंकदाची एक क्लिप शेयर करण्यात आली आहे. यामध्ये एक व्यक्ती हातात एक प्राणी घेऊन काही तरी माहिती सांगत आहे. या प्राण्याने तोंड उघडताच माणसाच्या ओरडण्याचा आवाज येतो. पोस्टमध्ये लिहिले की, हाच तो प्राणी दफनभूमित असतो (कबर बिचू ) माणसाप्रमाणे आवाज काढतो. आपल्याला दिसत नाही. त्यामुळे माणूस दफनभूमित विचित्र आवाज येण्याच्या कथा सांगतो हाच तो प्राणी. हा व्हिडियो फेसबुकवर मोठ्या प्रमाणात शेयर होत आहे.

तथ्य पडताळणी
व्हिडियोमध्ये दिसणारा प्राणी कासवासारखा दिसतो. म्हणून गुगलवर Screaming Turtle असे सर्च केले. तेव्हा मायकल डॅनफोर्ड नावाच्या व्यक्तीने खालील व्हिडियो अपलोड केल्याचे आढळले.
सदरील व्हिडियोचे लक्ष देऊन निरीक्षण केले तर लक्षात येईल की, व्हिडियो टिकटॉक या लोकप्रिय अॅपद्वारे तयार करण्यात आला आहे. हा व्हिडियो कोणत्या अकाउंटवरून (@mdanford1105) शेयर झाला हेदेखील दिसते. त्यानुसार टिकटॉकवर या व्हिडियोचा शोध घेतला. माईक नावाच्या व्यक्तीने हा व्हिडियो टिकटॉकवर शेयर केल्याचे आढळले. या व्हिडियोबद्दल Alligator Snapping Turtle Scream Comedy असे लिहिले आहे. त्याने हा व्हिडियो केवळ गम्मत म्हणून तयार केला होता. व्हिडियोमध्ये दिसणारा प्राणी कासव असून त्याचे नाव Alligator Snapping Turtle असे आहे.

मूळ व्हिडियो येथे पाहा- टिकटॉक
टिकटॉक अॅपमध्ये युजरला व्हिडियोवर दुसरा आवाज डब (Dub) करण्याची सुविधा असते. व्हिडियोत दिसणारा कासव जेव्हा तोंड उघडतो तेव्हा माणूस ओरडण्याचा आवाज टाकण्यात आला आहे. टिकटॉकवर कोणता आवाज वापरण्यात आला याची माहिती असते. त्यानुसार, या व्हिडियोमध्ये Authentic Sound Effects तर्फे तयार करण्यात आलेला Scream, Man हा आवाज वापरण्यात आला आहे. हा आवाज वापरून असे अनेक व्हिडियो तुम्ही येथे पाहू शकता. युट्यूबवर ऑथेंटिक साउंड इफेक्ट्स नावाच्या युट्यूब चॅनेलवर माणूस किंचाळत असल्याचा आवाज उपलब्ध आहे. तो तुम्ही खाली ऐकू शकता.
व्हिडियोतील व्यक्तीसुद्धा इंग्रजीतून सांगतो की, मगरीसारख्या प्रजातीशी साम्य असणाऱ्या या कासवाला Alligator Snapping Turtle म्हणतात. यावरून हे स्पष्ट होते की, हा काही “कबर बिचू” नावाचा दफनभूमीत राहणारा प्राणी नाही. या व्हिडियोत माणूस ओरडण्याचा आवाज एडिट करून टाकण्यात आला आहे.
काय असतो Alligator Snapping Turtle?
नॅशनल जिओग्राफिक आणि नॅशनल वाईल्डलाईफ फेडरेशनच्या माहितीनुसार, मगरीसारखा असणारा हा गोड्या पाण्यातील कासव अमेरिकेत आढळतो. ही प्रजाती जगातील महाकाय कासवांपैकी एक आहे. या कासवाच्या पाठीवर काटेरी कवच, पक्षाच्या चोचीसारखा धारदार जबडा, आणि मगरीसारखी शेपूट असते. त्यांचे आयुष्यमान 50 ते 100 वर्षे असू शकते. जीवनाचा बहुतांश काळ ते पाण्यात राहतात. वरकरणी शांत दिसणाऱ् या कासवाच्या जबड्यात जबरदस्त ताकत आहे.

अधिक माहिती येथे वाचा – नॅशनल जियोग्राफिक
ब्रेव्ह विल्डरनेस नावाच्या चॅनेलवर या कासवाबद्दल अधिक माहिती देण्यात आली आहे. चावा घेण्यासाठी उत्सुक असतो म्हणून या कासवाला Snapping म्हणतात. खालील व्हिडियोमध्ये Alligator Snapping Turtle आणि Common Snapping Turtle यांच्यामधील फरक सांगितलेला आहे. या व्हिडियोमध्ये कासव माणसाच्या ओरडण्याचा आवाज काढत नाहीए.
निष्कर्ष
व्हिडियोत दिसणारा प्राणी अॅलिगेटर स्नॅपिंग टर्टल (एक प्रकारचा कासव) आहे. टिकटॉकवर बनविलेल्या या व्हिडियोत कासवाला माणसाच्या ओरडण्याचा आवाज टाकण्यात आला आहे. हा कासव तसे ओरडत नाही. पाण्यात राहणारा हा कासव अमेरिकत आढळतो. त्यामुळे कबरीमधून माणसाप्रमाणे आवाज काढणाऱ्या कथित “कबर बिचू” प्राण्याचा दावा असत्य आहे.

Title:VIDEO: माणसाच्या आवाजात ओरडणाऱ्या “कबर बिचू”चा व्हिडियो खोटा आहे. हा कासव आहे.
Fact Check By: Agastya DeokarResult: False
