तब्बल पाच वर्षांनी संसदेने मंजुरी मिळाल्यानंतर वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) केंद्र सरकारने लागू केला आहे. याच पार्श्वभूमीवर आता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीदेखील हाच कायदा लागू केला आहे, असा दावा करणारा ट्विटचा स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा स्क्रीनशॉट आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल ट्विट खोटे आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अशी कोणतीही घोषणा केलेली नाही.

काय आहे दावा ?

व्हायरल स्क्रीनशॉटमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या नावाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “भारत सरकारचा विरोध करण्यासाठी, पाकिस्तान सरकारने स्वतःचे CAA अधिसूचित करण्याचा निर्णय घेतला आहे, या ठिकाणी भारतातील मुस्लिमांना तेथे छळ होत असेल तर त्यांना पाकिस्तानचे नागरिकत्व दिले जाईल.”

मूळ पोस्ट – फेसबुक

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम पाकिस्तान सरकारने असा कोणता निर्णय घेतला असता तर ही मोठी बातमी ठरली असती. परंतु, कोणत्याही अधिकृत माध्यमांवर अशी बातमी आढळली नाही.

कीव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, शाहबाज शरीफ यांनी अशी कोणतीही पोस्ट केलेली नाही.

या उलट त्यांच्या अधिकृत खात्यावरील सर्वात अलीकडील पोस्ट म्हणजे पाकिस्तानचे नवीन पंतप्रधानपदी नियुक्त झाल्याबद्दल सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स आणि पंतप्रधान यांच्या दूरध्वनीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे ट्विट दिसते.

ट्विट | आर्काइव्ह

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल स्क्रीनशॉट बनावट असून पाकिस्तान सरकारने किंवा पाकिस्तान पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी CAA लागू केलेला नाही. खोट्या दाव्यासह स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:पाकिस्तान पंतप्रधानांनी खरंच CAA लागू केले का ? वाचा सत्य

Written By: Sagar Rawate

Result: Misleading