भारताच्या माजी पंतप्रधानांच्या मुलाला अमेरिकेत ड्रग्ज नेताना खरंच पकडले होते का?

False राजकीय | Political

लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीमध्ये अनेक नव्या-जुन्या गोष्ट बाहेर काढल्या जात आहेत. सध्या सोशल मीडियावर एका इंग्रजी बातमीचे कात्रण पसरविले जात आहेत. त्यातील बातमीनुसार, भारताच्या एका माजी पंतप्रधानाच्या मुलाला अमेरिकेतील बॉस्टन शहराच्या विमानतळावर अंमली पदार्थ घेऊन जाताना पकडण्यात आले होते. या बातमीची सतत्या फॅक्ट क्रेसेंडोने तपासली.

फेसबुकअर्काइव्ह

पोस्टमध्ये ‘द बोस्टन…’ नावाच्या एका कथित वृत्तपत्रातील बातमीचे कात्रण शेयर केलेले आहे. 30 सप्टेंबर 2001 रोजीच्या या बातमीचे ‘भारतीय नेत्याला अटक’ असे शीर्षक आहे. यात म्हटले की, बॉस्टन विमानतळावर एका भारतीय नेत्याला अंमली पदार्थ आणि अघोषित रोकड घेऊन जात असताना ताब्यात घेण्यात आले. सुत्रांनुसार, हा नेता भारताच्या माजी पंतप्रधानांचा मुलगा आहे. एएफपी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील भारतीय राजदूतांच्या हस्तक्षेपानंतर त्याला सोडून देण्यात आले.

फेसबुक युजरने पोस्टमध्ये प्रश्न विचारला की, ओळखा हा कोण राजपुत्र अडविला होता बोस्टन इथे 2001 साली? अनेकांनी कमेंट्समध्ये राहुल गांधी यांचे नाव घेतले.

तथ्य पडताळणी

कात्रणामध्ये वृत्तपत्राचे पूर्ण नाव दिलेले नाही. बॉस्टन शहरातील ‘द बॉस्टन ग्लोबहे प्रसिद्ध वृत्तपत्र आहे. परंतु, बॉस्टन ग्लोबच्या वेबसाईटवर आम्हाला अशी काही बातमी आढळली नाही. एएफपी वृत्तसंस्थेच्या वेबसाईटवरदेखील ही बातमी उपलब्ध नाही.

बातमीतील मजकुर बारकाईने वाचल्यास अनेक विसंगती आढळून येतात. त्या पुढीलप्रमाणे आहेत:

1. शीर्षकात ARREST (अटक) तर, बातमीत DETAINED (ताब्यात) लिहिले आहे. दोन्हीचा अर्थ वेगळा आहे. कोणतेही दैनिक किमान एखाद्या पंतप्रधानांचा मुलाविषयी बातमी देताना अशी चूक करणार नाही.

2. बातमीत डेटलाईन (शहराचे नाव, तारीख) दिलेली नाही. वृत्तपत्र शैलीनुसार, बातमीच्या सुरुवातीला शहराचे नाव आणि तारीख लिहिली जाते.

3. बातमी पान क्र. 13 वरील आहे. मग पेपरचे मास्टहेड (मुख्य नाव) तेथे कसे? मास्टहेड शक्यतो पहिल्या पानावार किंवा जाहिरात असल्यास पुढील विषम क्रमांकाच्या पानावर असते.

4. बातमीत दिलेला दिनांक अमेरिकेत प्रमाण मानल्या जाणाऱ्या AP STYLEBOOK नुसार नाही. बातमीत सप्टेंबर आणि 30 तारीख यामध्ये स्वल्पविराम नव्हता पाहिजे.

अशा विसंगतींमुळे या कात्रणाच्या सत्यतेविषयी शंका घेण्यास वाव आहे. मग आम्ही हे कात्रण गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. तेव्हा या कात्रणासारखे इतर अनेक बातम्यांची कात्रणं आढळली. त्यातून FODEY ही वेबसाईट समोर आली. या वेबसाईटवर हव्या त्या मजकुराला वृत्तपत्र कात्रणाचे (Newspaper Clipping) रूप देता येते. त्यासाठी केवळ वृत्तपत्राचे नाव, दिनांक, शीर्षक, मजकूर वेबसाईटवर लिहावे लागते. या वेबसाईटला येथे भेट द्या – FODEY

आम्ही कात्रणातील बातमीचा मजकूर तसाच ठेवून वृत्तपत्राचे नाव (Fact Check), दिनांक (20 April, 2019), आणि शीर्षक (This Is False News) असे केले. त्यातून खालील कात्रण मिळाले.

याचाच अर्थ की, दि बोस्टन… वर्तमानपत्राचे कात्रणदेखील असेच बनविले आहे. आता फेसबुक पोस्टमधील कात्रण आणि फॅक्ट क्रेसेंडोने तयार केलेले कात्रण यांची तुलना करू.

यावरून सिद्ध होते की, व्हायरल होत असलेले बातमीचे कात्रण बनावट आहे. तशी कोणतीच बातमी कोणत्याही वृत्तपत्रात आली नव्हती.

मग राहुल गांधीचा याच्याशी का संबंध जोडला जात आहे?

द हिंदू या दैनिकाने 29 सप्टेंबर 2001 रोजी Was Rahul Gandhi detained by FBI? अशा मथळ्याखाली एक बातमी केली होती. अनामिक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांना बॉस्टन विमानतळावर एफबीआयने चौकशीसाठी थांबविले होते. भारतीय राजदूत ललित मानसिंग यांच्या हस्तक्षेपानंतर राहुल गांधी यांनी सोडण्यात आले. बातमीमध्ये अंमली पदार्थ किंवा अघोषित रोकड यांचा उल्लेख नाही

राहुल गांधी यांना थांबविण्याचे नेमके कारण कळू शकले नसले तरी, 9/11 दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेतील सर्वच विमानतळांवर कसून चौकशी करण्यात येत असल्यामुळे तसे घडले असावे, अशी शक्यता बातमीत व्यक्त केली आहे. (मूळ बातमी येथे वाचा – द हिंदूअर्काइव्ह)

परंतु, या घटनेचा आणि फेसबुवरील कात्रणातील बातमीचा काही संबंध नाही. कारण ते कात्रण बनावट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे राहुल गांधी यांनी 2004 साली राजकारणात सक्रीय प्रवेश केला. त्यामुळे कोणतेही वृत्तपत्र 2001 साली त्यांचा ‘राजकीय नेता’ (Politician) असा उल्लेख करणार नाही.

निष्कर्ष

फेसबुक पोस्टमधील बातमीचे कात्रण कोणत्याही वृत्तपत्राचे नसून, ते FODEY नावाच्या वेबसाईटवरून तयार करण्यात आले आहे. त्यामुळे भारताच्या माजी पंतप्रधानांच्या मुलाला अंमली पदार्थ घेऊन जाताना अमेरिकेतील विमानतळावर पकडल्याचा दावा असत्य आहे.

Avatar

Title:भारताच्या माजी पंतप्रधानांच्या मुलाला अमेरिकेत ड्रग्ज नेताना खरंच पकडले होते का?

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False