
यंदाच्या लोकसभेत कोणत्या नेत्याच्या सभेला किती गर्दी जमते, सभामंडपातील किती खुर्च्या रिकाम्या राहतात याची जास्तच चर्चा होत आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या पुण्यातील सभेबाबतही अशीच बातमी लोकसत्ता दैनिकाने दिली होती. त्यांच्या सभेकडे पुणेकरांनी पाठ फिरवल्याचे त्यात म्हटले आहे. सोशल मीडियावर मात्र ही बातमी खोटी असल्याचा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.
20 एप्रिल रोजीच्या पोस्टमध्ये म्हटले की, पुण्याला सभा उद्या (रविवार, 21 एप्रिल) आहे; परंतु मीडिया पोस्ट आजच (शनिवारी) व्हायरल करीत आहेत. पुरावा म्हणून सोबत प्रकाश आंबेडकर व असदुद्दीन ओवैसी यांची पुण्यात रविवारी सभा, अशा बातमीचे कात्रण दिलेले आहे. याद्वारे मीडियावर कडाडून टीका करण्यात येत आहे.
मग खरंच सभा रविवारी असताना एक दिवस आधी शनिवारीच सभेला प्रतिसाद नसल्याची खोटी बातमी लोकसत्ताने छापली का?
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम लोकसत्ताची मूळ बातमी पाहू. ‘प्रकाश आंबेडकर यांच्या सभेकडे पुणेकरांची पाठ’ अशा मथळ्याखाली लोकसत्ताने शनिवारी, 20 एप्रिल रोजी दुपारी ही बातमी वेबसाईटवर प्रसिद्ध केली होती. बातमीत रिकाम्या खुर्च्यांचा तसेच प्रकाश आंबेडकर मंचावरून भाषण करतानाचा फोटो दिलेला आहे. बातमीनुसार ही सभा पुण्यातील वडगाव धायरी येथे झाली. वंचित बहुजन आघाडीचे बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नवनाथ पडळकर यांच्या प्रचारार्थ ही सभा घेण्यात आली होती.

मूळ बातमी येथे वाचा – लोकसत्ता । अर्काइव्ह
सकाळ आणि लोकमत या दैनिकांनीदेखील या सभेच्या बातम्या दिल्या आहेत. या सभेत प्रकाश आंबेडकर यांनी काळा पैसा, संविधान बदलण्याची भाषा, शहिदांचा अपमान या मुद्यांवरून भाजपवर सडकून टीका केली. भाजपद्वारे प्रशासनावर दबाव टाकून विरोधकांच्या सभांना परवानगी नाकारण्यात येत असल्याचेही ते यावेळी म्हणाले. तसचे शरद पवारांवर निशाणा साधत त्यांनी घराणेशाहीला मतदान न करण्याचे आवाहन केले होते.

सविस्तर बातम्या येथे वाचा – लोकमत । सकाळ
आता पोस्टमधील बातमीचे कात्रण पाहू. कात्रणातील बातमी ही लोकमत हॅलो पुणेमध्ये 18 एप्रिल रोजी पान क्रमांक दोनवर प्रकाशित झाली होती. या बातमीनुसार, अॅड. प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे नेते खासदार असुद्दीन ओवैसी यांची रविवारी (21 एप्रिल) पुण्यातील एसएसपीएमएसच्या (SSPMS) मैदानावर ही सभा होणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे पुण्याचे उमेदवार अनिल जाधव यांच्या प्रचारार्थ ही सभा घेण्यात येणार आहे.

मूळ बातमी येथे वाचा – लोकमत (ई-पेपर) । लोकमत (ऑनलाइन)
पुण्यातील रविवारच्या या सभेची महाराष्ट्र टाईम्सने बातमी आणि फोटो प्रसिद्ध केला आहे. यामध्येही दिले आहे की, ही सभा प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी अनिल जाधव यांच्या प्रचारासाठी घेतली होती. अर्थात, पुण्यातील शनिवारची सभा नवनाथ पडळकर तर, रविवारची सभा अनिल जाधव यांच्या प्रचारार्थ घेण्यात आली होती. म्हणजेच या दोन्ही सभा वेगवेगळ्या आहेत.

मूळ बातमी येथे वाचा – महाराष्ट्र टाईम्स
लोकसत्तानेदेखील रविवारच्या या सभेची बातमी दिली आहे. तिचे शीर्षक ‘मला घाबरुन शरद पवारांनी माढ्यातून माघार घेतली’ असे आहे. ती तुम्ही येथे वाचा – लोकसत्ता । अर्काइव्ह
निष्कर्ष
लोकसत्ताची बातमी प्रकाश आंबेडकर यांच्या पुण्यातील वडगाव धायरी येथे शनिवारी झालेल्या सभेची आहे. रविवारी होणाऱ्या सभेची बातमी ही पुण्यातील एसएसपीएमएसच्या (SSPMS) मैदानावरील सभेची आहे. दोन्ही सभा वेगवेगळ्या आणि दोन वेगळ्या उमेदवारांच्या प्रचारासाठी घेण्यात आल्यात. त्यामुळे लोकसत्ताने रविवारच्या सभेची बातमी एक दिवस आधीच (शनिवारी) दिली, असा दावा असत्य ठरतो. लोकसत्ताने दोन्ही दिवसांच्या सभेच्या बातम्या दिलेल्या आहेत.

Title:प्रकाश आंबेडकरांच्या सभेतील रिकाम्या खुर्च्यांची बातमी लोकसत्ताने एक दिवस आधीच छापली का?
Fact Check By: Mayur DeokarResult: False
