
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ला भाड्याने दिल्याचा दावा करणारे छायाचित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मोदींनी रेल्वे स्थानक विकल्याचा आरोपही या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. हे सत्य आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रिसेंडोने केली आहे.

तथ्य पडताळणी
ऐतिहासिक लाल किल्ला 25 कोटीत खासगी कंपनीकडे अशी शीर्षकाचे वृत्त दैनिक पुढारीने 28 एप्रिल 2018 मध्ये प्रसिध्द केले आहे. या वृत्तात ‘अडॉप्ट अ हेरीटेज’ या योजने अंतर्गत दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला दालमिया ग्रुपने 5 वर्षांसाठी दत्तक घेतला असल्याचे म्हटले आहे. केंद्र सरकार आणि दालमिया ग्रुप यांच्यात २५ कोटींला हा करार झाल्याचेही या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. ‘अडॉप्ट अ हेरीटेज’ ही योजना काय आहे, याची माहितीही या वृत्तात देण्यात आली आहे.

ऐतिहासिक लाल किल्ल्यावर दालमिया ‘बादशहा’ अशा शीर्षकाचे वृत्त दैनिक सामनाने प्रसिध्द केले आहे. या वृत्तातही लाल किल्ला हा केंद्र सरकारने दत्तक दिल्याचे म्हटले आहे.

मोदी सरकारने रेल्वे स्टेशन विकल्याचा आरोपही या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. गुगलवर याबाबत सर्च केल्यावर सरकारने रेल्वे स्टेशन विकल्याची कोणतीही बाब आढळून आली नाही. खासगी आणि सरकारी भागीदारीत काही रेल्वे स्थानकांचा विकास करण्याचा भारतीय रेल्वे विचार करत असल्याचे वृत्त मात्र अनेक ठिकाणी आढळून आले आहे.
खाली दिलेल्या संकेतस्थळावर याबाबत अधिक माहिती उपलब्ध आहे.
एअर इंडियाला विकण्याची सरकार तयारी करत असल्याचा दावाही या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. भारत सरकार एअर इंडियातून र्निगुंतवणूक करत असल्याचे वृत्त मात्र खरे आहे. द इकोनॉमिक टाईम्सने याबाबतचे वृत्त दिले आहे.

निष्कर्ष
फेसबुक पोस्टमध्ये करण्यात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ला भाड्याने दिल्याचा दावा फॅक्ट क्रिसेंडोच्या तथ्य पडताळणीत असत्य आढळला आहे. रेल्वे स्टेशन विकण्यात आल्याचा दावाही असत्य आढळला आहे. एअर इंडियातील र्निगुंतवणूकीचा दावा मात्र सत्य आढळला आहे. त्यामुळे ही पोस्ट संमिश्र स्वरुपाचा आढळून आली आहे.

Title:सत्य पडताळणी : मोदींनी खरोखरच लाल किल्ला भाड्याने दिला?
Fact Check By: Dattatray GholapResult: Mixture

No. Comment only share,