
संग्रहित छायाचित्र
लोकसभा 2019 च्या निवडणूकीत भाजप पक्षाला मिळालेल्या यशानंतर कर्नाटक राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवडणूका झाल्या. यासंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये कर्नाटक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत काँग्रेस पक्षाला 1880 जागा मिळाल्या आहेत असा दावा करण्यात आला आहे. याविषयी फॅक्ट क्रिसेंडोने केली सत्य पडताळणी.
सत्य पडताळणी
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये कर्नाटक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या बाबतीत विविध पक्ष निवडून आल्यानंतर निकालाची आकडेवारी देण्यात आली आहे. यामध्ये पोस्टमध्ये देण्यात आलेली आकडेवारी खालीलप्रमाणे आहे.
कर्नाटक नगरपालिका निवडणूक
काँग्रेस – 1880, जेडीएस – 828, भाजप – 714
एका आठवड्यात मोदी लाट संपली कारण निवडणूक बॅलेट पेपरने झाली असे पोस्टमध्ये म्हंटले आहे.
पोस्टमध्ये नमूद करण्यात आलेल्या आकडेवारीची सत्यता पडताळण्यासाठी आम्ही कर्नाटकाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर शोध घेतला.
- कर्नाटक राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या किती जागांसाठी निवडणूक झाली?
कर्नाटक राज्यात एकूण 1221 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागेसाठी निवडणूका झाल्या. ही निवडणूक 29 मे रोजी मतदानाद्वारे झाली. त्यानंतर या निवडणूकीचा निकाल 30 मे रोजी लागला. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये काँग्रेस पक्षाने 1880 जागा जिंकल्या हा दावा खोटा ठरला. कारण निवडणूकाच जर एकूण 1221 जागांसाठी होणार असतील तर केवळ काँग्रेस पक्षालाच 1880 जागा कशा मिळतील हा प्रश्न उपस्थित होतो. म्हणून काँग्रेस पक्षाच्या बाबतीत देण्यात आलेला आकडा हा चुकीचा आहे, हे संशोधनाअंती समोर आले.
- कर्नाटक राज्याचा स्थानिक स्वराज्य संस्थांचा निकाल काय आहे?
कर्नाटक राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीचा निकाल आपण कर्नाटक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहू शकतो. या वेबसाईटवर सतत स्क्रोल होणाऱ्या रिझल्ट ऑफ युएलबी जनरल इलेक्शन 2019 येथे क्लिक केल्यानंतर आपण सविस्तर निकाल पाहू शकतो.
कर्नाटक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आयोग । अर्काईव्ह
या निकालानंतर आपणास असे समोर येते की कर्नाटक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीमध्ये काँग्रेस पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या हे जरी खरे असले तरी, पोस्टमध्ये नमूद करण्यात आलेली आकडेवारी आणि प्रत्यक्षात काँग्रेस पक्षाने जिंकलेल्या जागा हे दोन्हीही वेगवेगळी आकडेवारी आहे.
कर्नाटक स्थानिक स्वराज्य आयोगाच्या अधिकृत वेबसाईटच्या अनुसार काँग्रेस पक्षाने 562, भाजप 406 आणि जेडीएस या पक्षाने 202 जागा जिंकल्या. याविषयी विविध वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये देण्यात आलेले कर्नाटक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकींचा विविध पक्षाचा निकाल देण्यात आलेला आहे. संपुर्ण संशोधनानंतर पोस्टमध्ये निकालासाठी देण्यात आलेली आकडेवारी आणि प्रत्यक्षात असणारी आकडेवारी यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळून येते. त्यामुळे पोस्टमध्ये नमूद करण्यात आलेली कर्नाटक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीची निकालासाठीची विविध पक्षांची आकडेवारी ही असत्य देण्यात आलेली आहे.
निष्कर्ष : सोशल मीडियावरील पोस्टमध्ये नमूद करण्यात आलेली काँग्रेस, भाजप आणि जेडीएस या पक्षाविषयी कर्नाटक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकालाची आकडेवारी असत्य आहे.

Title:कर्नाटक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत काँग्रेसला 1880 जागा मिळाल्या का?
Fact Check By: Amruta KaleResult: False
