
राहुल गांधी यांची एक व्हिडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर शेअर केली जात आहे. “शेतकऱ्यांना कर्ज देऊ नका, नाहीतर त्यांना तशीच सवय लागेल,” असे विधान या व्हिडिओमध्ये ऐकू येते.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळअंती कळाले की, 2018 मधील ही क्लिपला सोयीनुसार एडिट करून चुकीच्या दाव्यासह शेअर केले जात आहे.
काय आहे दावा
सोशल मीडियावरील व्हायरल क्लिपमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी कथितरीत्या म्हणतात की, “किसान का कर्ज़ा माफ नहीं करना चाहिए. क्योंकि अगर कर्ज़ा माफ किया तो किसान की आदत खराब हो जाएगी.”

तथ्य पडताळणी
सदरील व्हिडिओचा शोध घेतल्यावर काँग्रेस पक्षाच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर 17 मे 2018 रोजी शेयर केलेला एक लाईव्ह व्हिडिओ आढळला. सोबत दिलेल्या माहितीनुसार, ते बिलासपुरमध्ये शेतकरी – आदिवासी रॅलीला संबोधित करीत होते.
या व्हिडिओतील 27:56 ते 28:53 दरम्यानच्या भाषणातून व्हायरल क्लिप घेतलेली आहे.
मूळ भाषणात राहुल गांधी म्हणतात की, “हिंदुस्थान की सरकार ने ढाई लाख करोड रुपयों का हिंदुस्तान के सबसे बडे उद्योगपतियों का कर्जा माफ किया है. मगर वही सरकार, जो पंद्रह लोगो के लिए ढाई लाख करोड माफ कर सकती है, मगर हिंदुस्तान को करोडो किसानों के लिए एक रुपया भी कर्जा माफ नहीं कर सकती. उनके नेता (भाजप) कहते हैं कि किसान का कर्जा माफ नहीं करना चाहिए. क्योंकि अगर किसान का कर्जा माफ किया तो किसान की आदत खराब हो जाएगी.”
म्हणजेच ते भाजप सरकारवर टीका करताना म्हणाले की, भाजप नेत्यांना असे वाटते की, शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले तर त्यांना त्याची सवय लागेल.
मूळ व्हिडिओ आणि व्हायरल व्हिडिओची तुलना पाहा.
निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की राहुल गांधी यांच्या जुन्या भाषणाची क्लिप सोयीनुसार एडिट करून ती अर्धवट माहितीसह फिरवली जात आहे. शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले तर त्यांना त्याची सवय लागेल, अशा आशयाचे विधान त्यांनी भाजप नेत्यांवर टीका करताना म्हटले होते.

Title:‘कर्ज माफ नका; शेतकऱ्यांना तशीच सवय लागेल’ असे राहुल गांधी म्हणाले का? वाचा सत्य
Fact Check By: Milina PatilResult: Missing Context
