
ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू जेम्स फॉकनर याने तो गे (समलैंगिक) असल्याची कबुली दिल्याची बातमी सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या या प्रसिद्ध क्रिकेटपटूने स्वतःहून अशी कबुली दिल्याची बातमी झी 24 तास या वृत्तवाहिनीने दिली. यामुळे क्रिकेट फॅन्सकडून प्रतिक्रियांचा पाऊस पडू लागला. अनेकांनी त्याच्या धाडसाचे कौतुक केले तर, काहींनी त्याला ट्रोलदेखील केले.

मूळ बातमी येथे वाचा – झी 24 तास । अर्काइव्ह
बातमीत म्हटले की, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू जेम्स फॉकनरने इन्स्टाग्रामवरून तो समलैंगिक असल्याची कबुली दिली आहे. त्याने सोमवारी आपला 29 वा वाढदिवस साजरा केला. त्यानिमित्त फॉकनरने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. ‘माझी आई आणि माझा बॉयफ्रेंड रॉब जुब. मागच्या ५ वर्षांपासून आम्ही दोघं एकत्र आहोत’, असं कॅप्शन फॉकनरने या फोटोला दिले आहे.
झी 24 तासने दिलेली बातमी त्यांनी फेसबुकवरदेखील शेयर केली आहे.
तथ्य पडताळणी
झी 24 तासने ही बातमी जेम्स फॉकनरच्या इन्स्टाग्राम पोस्टवरून केली आहे. ती पोस्ट तुम्ही खाली पाहू शकता. यामध्ये फॉकनर त्याची आई आणि एक मुलासोबत बसलेला दिसतो. या फोटोला कॅप्शन देताना त्याने म्हटले की, माझी आई रोझलिन कॅरोल फॉकनर आणि बॉयफ्रेंड (जीवलग मित्र!!!) रॉब यांच्यासोबत वाढदिवसानिमित्त जेवण करताना. तसेच Together For 5 Years असा हॅशटॅगदेखील दिला.
वरील फोटोच्या कॅप्शनमध्ये फॉकनरने बॉयफ्रेंड असा शब्द जरी वापरला असला तरी त्याने पुढे कंसात बेस्ट मेट म्हटले आहे. Mate या शब्दाचा ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि ब्रिटनमध्ये मित्र असा अर्थ होतो. तसेच फॉकनरने बेस्ट मेट लिहिताना तीन उद्गार चिन्हसुद्धा दिले आहेत. म्हणजे त्याने बॉयफ्रेंड शब्द जरी वापरला असली तरी पुढे कंसात त्याला जीवलग मित्र म्हणायचे असे स्पष्ट केले आहे.
तसेच त्याने पोस्टमध्ये तो गे आहे, असे म्हटलेले नाही. तो समलैंगिक असल्याचीही कबुली दिलेली नाही.
विशेष म्हणजे फॉकनरने दुसऱ्या दिवशी आणखी एक पोस्ट टाकून जाहीर केले की, तो गे नाही. त्याने लिहिले की, माझ्या कालच्या पोस्टमुळे अनेकांचा गैरसमज झाला. मी गे (समलैंगिक) नाही. परंतु, एलजीबीटी समुदायाकडून मला मिळालेला पाठिंबा शानदार होता. मी जरी समलैंगिक नसलो तरी, प्रेम हे प्रेम असते. रॉब हा माझा अतिशय चांगला मित्र आहे. आम्हाला मित्र म्हणून एकत्र राहण्याला काल पाच वर्षे पूर्ण झाली. तुम्ही दिलेल्या पाठिंब्यासाठी धन्यवाद.
फॉकनरच्या कॅप्शनमुळे गैरसमज झाला की तो गे आहे; परंतु बातम्यांमध्ये त्याने तशी कबुली दिल्याचे म्हटले आहे. पण त्याने तशी कबुली दिलेली नाही. त्याच्यावर सरळसरळ समलैंगिक म्हणून शिक्का मारला गेला.
फॉकनरच्या स्पष्टीकरणानंतर झी 24 तासने या बातमीत बदल करून अपडेट देणे अपेक्षित होते. मात्र तसे न करता त्यांनी 30 एप्रिल रोजी वेगळी बातमी दिली. त्यामुळे आधीची बातमी अद्यापही सोशल मीडियावर शेयर केली जात असून, वाचकांपर्यंत त्यातून चुकीची माहिती पोहोचत आहे.

मूळ बातमी येथे वाचा – झी 24 तास । अर्काइव्ह
निष्कर्ष
जेम्स फॉकनरच्या इन्स्टाग्राम पोस्टचा चुकीचा अर्थ लावून त्याने गे असल्याची कबुली दिल्याची बातमी झी 24 तासने दिली. स्वतः फॉकनरे या संदर्भात स्षष्टीकरण देत तो गे नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ही बातमी असत्य ठरते.

Title:NOT GAY: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू जेम्स फॉकनर गे नाही. इन्स्टाग्राम पोस्टमुळे झाला घोळ
Fact Check By: Mayur DeokarResult: False
