पीएम मोदींनी राफेलबाबत नुकसान मान्य केल्याचा दावा खोटा, AI व्हिडिओ व्हायरल

False राजकारण | Politics

इंटरनेटवर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानने राफेल लढाऊ विमान पाडल्याचे मान्य करताना ऐकू येतात. तसेच भारताची प्रतिमा खराब झाल्याचा उल्लेखही या व्हिडिओमध्ये केला जातो.

हा व्हिडिओ शेअर करत असा दावा केला जात आहे की 2025 मधील भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यान पीएम मोदींनी राफेल संदर्भात नुकसान मान्य केले.

फॅक्ट चेक

रिव्हर्स इमेजमध्ये आम्हाला या व्हिडिओचे मूळ फुटेज सापडले. दिल्ली भाजपच्या फेसबुक पेजवरून हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता. 

मूळ व्हिडिओ पाहिल्यावर स्पष्ट झाले की पीएम मोदी व्हायरल क्लिपमध्ये दाखवल्याप्रमाणे काहीही बोलले नाहीत. ते फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रों यांच्या स्वागताबाबत बोलत होते.

या भाषणात त्यांनी मुंबईत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही देशांमधील सहकार्य, AI समिट आणि भारत-फ्रान्स संबंधांबाबत सामान्य चर्चा केली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दाखवलेले राफेल किंवा पाकिस्तानबाबतचे कोणतेही विधान त्यांनी केलेले नाही.

पीएम मोदी यांच्या अधिकृत युट्यूब पेजवर 17 फेब्रुवारी 2026 रोजी अपलोड केलेला या कार्यक्रमाचा संपूर्ण व्हिडिओही सापडला. त्यामध्येही असे कोणतेही विधान आढळत नाही.

तसेच पीटीआयच्या अधिकृत पोस्टमध्येही या कार्यक्रमातील पीएम मोदींचे मूळ वक्तव्य दिलेले आहे, ज्यामध्ये राफेल किंवा अशा प्रकारच्या कोणत्याही दाव्याचा उल्लेख नाही.

पीआयबीच्या सोशल मीडिया पोस्टमध्येही व्हायरल व्हिडिओ आणि मूळ व्हिडिओ यांची तुलना दाखवण्यात आली आहे. त्यातून स्पष्ट होते की व्हायरल व्हिडिओमध्ये पीएम मोदींच्या आवाजाचा वापर करून AI च्या मदतीने एडिटिंग करण्यात आले आहे.

निष्कर्ष

तपासातून स्पष्ट होते की पीएम मोदींनी राफेलबाबत नुकसान मान्य केल्याचा दावा पूर्णपणे खोटा आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये त्यांचा आवाज AI च्या मदतीने एडिट करून चुकीचा संदेश पसरवला जात आहे. त्यामुळे हा दावा भ्रामक आहे.

Result Stamp

Title: पीएम मोदींनी राफेलबाबत नुकसान मान्य केल्याचा दावा खोटा, AI व्हिडिओ व्हायरल

Written By: Agastya Deokar

Result: False