तथ्य पडताळणीः खरंच टिकली लावून बुरखाधारी महिलांनी भाजपचा प्रचार केला?

False राजकीय | Political राष्ट्रीय

(Image Source:Facebook )

सोशल मीडियावरील एका व्हायरल फोटोच्या आधारे दावा केला जातोय की, भाजपचा प्रचार करणारी एक बुरखा परिधान केलेली महिला टिकली काढायची विसरली. ही पोस्ट तुम्ही खाली पाहू शकता. या पोस्टवरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोची पडताळणी केली.

अर्काइव्ह

संतोष शिंदे नामक युजरने वरील फोटो 24 मार्च रोजी पोस्ट केला होता. यामध्ये भाजपचा प्रचार करणाऱ्या काही बुरखाधारी महिला दिसत असून एका महिलेच्या कपाळावर टिकली दिसत आहे. सोबत कॅप्शन दिले की, #गडबडीत मॅडम टिकली काढायला विसरल्या…! पडताळणी करेपर्यंत ही पोस्ट 1400 पेक्षा जास्तवेळा शेयर करण्यात आलेली आहे. या फोटोवरून अनेकांनी भाजपवर टीका केली आहे.

तथ्य पडताळणी

फोटोमध्ये एकुण 6 बुरखाधारी महिला दिसतात. सोबत एक साडी परिधान केलेली महिलादेखील आहे. त्यांच्या गळ्यामध्ये भाजपचे स्कार्फ आहेत. फोटोतील सर्वात समोरील बुरखाधारी महिलेच्या कपाळावर टिकली असल्याचे पांढरे वर्तुळ करून दाखविले आहे. बुरखा घातलेल्या इतर महिलांनी टिकली लावली नसल्याचे प्रथमदर्शनी दिसते.

वरील माहितीच्या आधारे फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोची सतत्या तपासण्यासाठी इंटरनेटवर विविध कीवर्ड्सने हा फोटो सर्च केला. तेव्हा- Muslim women Burqa BJP – असे सर्च केले असता युट्यूबवर खालील व्हिडियो आढळला. सोल्यूशन्स ऑफ ह्यूमॅनिटी नावाच्या युट्यूब चॅनेलवरून हा व्हिडियो 13 डिसेंबर 2018 रोजी अपलोड करण्यात आला होता.

28 सेंकदाच्या या व्हिडियोमध्ये काही बुरखाधारी महिला एका गल्लीतून जाताना दिसतात. हा व्हिडियो फ्रेम बाय फ्रेम करून पाहिला असता, फेसबुक पोस्टमधील फोटोशी तंतोतंत साम्य असणारी फ्रेम मिळाली. दोहोंची केलेली तुलना तुम्ही खाली पाहू शकता.

या संपूर्ण व्हिडियोमध्ये कुठेच सदरील महिलेने टिकली लावलेली नाही.

हाच व्हिडियो आम्हाला उत्कर्ष प्रताप सिंह या युजरने 15 जानेवारी 2019 रोजी युट्युवबवर अपलोड केलेला आढळला. तो तुम्ही येथे पाहू शकता. – युट्यूब

यावरून हे स्पष्ट होते की, सदरील पोस्टमधील फोटो वरील व्हिडियोमधील आहे आणि व्हिडियोमध्ये बुरखाधारी महिलेच्या कपाळावर टिकली लावलेली नाही.

यानंतर मग रिव्हिल फोटो फॉरेन्सिकवर मेटाअ‍ॅनालिसिस केल्यावरदेखील, हा फोटो एडिट केला असण्याची शक्यता समोर आली. मेटाअ‍ॅनालिसिसद्वारे मूळ फोटोमध्ये जर बदल केलेले असतील त्याची माहिती कळते.

निष्कर्ष

व्हायरल पोस्टमधील फोटो एडिट करून त्यामध्ये टिकली दाखविण्यात आलेली आहे. हा फोटो ज्या व्हिडियोमधून घेतला आहे, त्यामध्ये कुठेही टिकली लावलेली नाही. त्यामुळे ही पोस्ट असत्य आहे.

Avatar

Title:तथ्य पडताळणीः खरंच टिकली लावून बुरखाधारी महिलांनी भाजपचा प्रचार केला?

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False