
गेल्या काही दिवसांपासून आमिर खानच्या नावे एक मेसेज व्हायरल होत आहे की, त्याने पिठाच्या पाकिटांतून मुंबईतील गरीबांना 15-15 हजार रुपयांची मदत केली. कोणताही गाजावाजा न करता गरजवंतांपर्यंत मदत पोहचविल्याबद्दल आमिर खानचे कौतुक होत आहे. परंतु, फॅक्ट क्रेसेंडोच्या अनेक वाचकांनी या मेसेजच्या सत्यतेविषयी विचारणा केली होती. आज अखेर त्याचे सत्य समोर आले.
काय आहे पोस्टमध्ये?

मूळ पोस्ट येथे वाचा – फेसबुक । अर्काइव्ह
मुंबईच्या झोपडपट्ट्यांमध्ये आमिर खानने खरंच अशी काही मदत केली का याविषयी माध्यमांमध्ये अनेक तर्कवितर्क लढविले जात होते. परंतु, याविषयी कोणतीही ठोस माहिती समोर येत नव्हती.
मेसेजचे नीट वाचन केल्यावर कळते की, यामध्ये कोणत्या झोपडपट्टीत पैसे वाटले, कधी वाटले, किती पाकिट वाटण्यात आले, वाटतानाचे फोटो अशी काहीच माहिती देण्यात आली नाही. यावरूनच मेसेजच्या सत्यतेविषयी शंका येते. जर हे दान गुप्तपणे करण्यात आले तर ते आमिर खानने केले हे कसं काय कळाले? हादेखील प्रश्न आहे.
अखेर सोशल मीडियावर हा मेसेज प्रचंड व्हायरल झाल्यानंतर स्वतः आमिर खानने याविषयी खुलासा केला. आमिरने सोमवारी सकाळी 10 वाजता ट्विट करून त्यांच्या नावे व्हायरल होत असलेला मेसेज फेक असल्याचे स्पष्ट केले.
त्याने ट्विटमध्ये म्हटले की, “मित्रांनो गव्हाच्या पीठाच्या पाकिटांतून मी पैसे वाटप केले नाही. एक तर ही पूर्णतः खोटी बातमी आहे किंवा दुसरे कोणी तरी रॉबिनहूडप्रमाणे निनावी मदत करू इच्छितो. परंतु, तो मी नव्हे!”
निष्कर्ष
पीठाच्या पाकिटांतून आमिर खानने पैसे वाटले नाही, हे अखेर आता स्पष्ट झाले आहे. अशी काही घटना घडली का याचीदेखील माहिती समोर आलेली नाही.
(फॅक्ट क्रेसेंडो मराठी आता टेलीग्रामवरसुद्धा ! आमच्या चॅनेलला जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.)

Title:आमिर खानने पिठाच्या पाकिटातून गरिबांना पैसे वाटले नाहीत. त्या व्हायरल मेसेज सत्य समोर आले.
Fact Check By: Agastya DeokarResult: False
