
राहुल गांधी यांनी 8 जून रोजी कोझिकोड येथे नर्स राजम्मा यांची भेट घेतली. राहुल गांधी यांच्या जन्मावेळी नर्स राजम्मा रुग्णालयात उपस्थित होत्या. त्यामुळे सुमारे 49 वर्षांनंतर झालेली ही भेट दोघांसाठी भावूक ठरली. या भेटीवरून मात्र सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, राजम्माचे सध्या वय 62 वर्षे आहे. म्हणजे राहुल गांधींच्या जन्माच्यावेळी (49 वर्षांपूर्वी) त्यांचे वय 13 वर्षे होते. तेरा वर्षांच्या नर्सने सोनिया गांधींची प्रसुती केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

काय आहे पोस्टमध्ये?
एएनआय वृत्तसंस्थेने राहुल-राजम्मा यांच्या भेटीबाबत केलेल्या ट्विटचा स्क्रीनशॉट पोस्टमध्ये देऊन दावा केला आहे की, राजम्माचे वय 62 आहे, राहुल गांधी 49 वर्षांचे आहेत. म्हणजे राहुलच्या जन्मावेळी राजम्मा 13 वर्षांचा होत्या. हा आहे मोठा स्कॅम.
तथ्य पडताळणी
राहुल गांधी यांनी नर्स राजम्मांची घेतलेल्या भेटीच्या बातम्या राष्ट्रीय आणि प्रादेशिक मीडियाने प्रसिद्ध केलेल्या आहेत. या बातम्यांची तपासणी केली असता एक बाब समोर येते की, राजम्मांचे सध्या वय 72 आहे. इंडिया टुडेने दिलेल्या बातमीत हे स्पष्ट नमूद केले आहे. यात म्हटले की, तब्बल 49 वर्षांनंतर 72 वर्षांच्या राजम्मांची राहुल गांधीसोबत प्रत्यक्ष भेट झाली. कुटुंबासह भेटायला आलेल्या राजम्मांचे हातात हात घेऊन राहुल यांनी त्यांना मिठी मारली. केरळच्या कोझीकोड येथे ही भेट घडली.

मूळ बातमी येथे वाचा – इंडिया टुडे । अर्काइव्ह
लोकसत्ताने दिलेल्या बातमीमध्येसुद्धा राजम्माचे वय 72 वर्षे असल्याचे स्पष्ट म्हटले आहे. राहुल गांधी यांचा जन्म 19 जून 1970 रोजी दिल्लीतील होली फॅमिली रुग्णालयात झाला होता. त्यावेळी राजम्मा तेथे नर्सिंगचे प्रशिक्षण घेत होत्या. सोनिया गांधीच्या प्रसुतीच्यावेळी त्या ऑपरेशन रुममध्ये डॉक्टरांच्या टीमसोबत हजर होत्या. तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नातवाला पाहून आम्ही भारावून गेलो होतो, असे त्या सांगतात. राजम्मा या 1987 साली व्हीआरएस घेऊन केरळला परत आल्या होत्या.

मूळ बातमी येथे वाचा – लोकसत्ता । अर्काइव्ह
आऊटलूक मॅगझीनने 30 एप्रिल 2019 रोजी राजम्मा यांची मुलाखत प्रसिद्ध केली होती. यामध्ये स्वतः राजम्मांनी सांगितले की, राहुल गांधीच्या जन्मावेळी त्या 23 वर्षांच्या होत्या. “सोनिया आणि राजीव गांधी यांच्या अगोदर मी राहुल गांधींना माझ्या हातात घेतले होते,” असे त्या गर्वाने सांगतात. पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीमध्येसुद्धा राजम्मा यांचे वय 72 वर्षे असल्याचे म्हटले आहे. याचाच अर्थ की, राजम्मा यांचे सध्या वय 62 नाही.

मूळ बातमी येथे वाचा – आऊटलूक । अर्काइव्ह
लोकसभा निवडणुकीच्या काळात जेव्हा राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाविषयी संशय घेण्यात आला तेव्हादेखील राजम्मा यांनी माध्यमांशी बोलून हे आरोप खोटे असल्याचे सांगितले होते. इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार, राजम्मा म्हणाल्या की, राहुल गांधीच्या नागरिकत्वाविषयी कोणीही आक्षेप घेऊ शकत नाही. त्यांच्या जन्माची सगळी माहिती रुग्णालयात उपलब्ध आहे.
निष्कर्ष
नर्स राजम्मा यांचे सध्याचे वय 72 वर्षे आहे. याचाच अर्थ की, राहुल गांधी यांच्या जन्मावेळी त्या 23 वर्षांच्या होत्या. त्यामुळे सदरील पोस्टमधील 13 वर्षांच्या नर्सचा दावा खोटा आहे.

Title:FAKE ALERT: राहुल गांधींच्या जन्मावेळी हजर असणारी नर्स राजम्मा तेव्हा 13 वर्षांची होती का?
Fact Check By: Mayur DeokarResult: False
