
राहुल गांधींनी काही काळापूर्वी भारतीय सैन्याबद्दल कथित विवादक टिप्पणी केल्याप्रकरणी लखनौ न्यायालयाने त्यांना समन्स पाठवले होते. या पार्श्वभूमीवर सध्या एक सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये राहुल गांधींसोबत काळा कोट घातलेला व्यक्ती दिसतो. दावा केला जात आहे की, राहुल गांधींसोबत सेल्फी काढणारी ती व्यक्ती लखनऊ न्यायालयातील न्यायाधीश आहेत.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, राहुल गांधीसोबत सेल्फी काढणारी व्यक्ती न्यायाधीश नाही.
काय आहे दावा ?
युजर्स हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “लखनऊ येथे एका सुनावणीसाठी राहुल गांधी हजर राहिले असता न्यायाधीश महोदयांना देखील त्यांच्यासोबत सेल्फी घ्यायचा मोह आवरला नाही.”
छत्तीसगड युवक काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर पेजनेदेखील हाच फोटो आणि दावा शेअर केला आहे.
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर न्यूज24 वेबसाइटवर हाच व्हायरल फोटो शेअर केलेला आढळला. ज्या सोबत महिती दिली की, सेल्फीमध्ये दिसणाऱ्या काळ्या कोटातील माणसाचे नाव सय्यद महमूद हसन असून तो 2006 पासून लखनौ जिल्हा न्यायालयात वकील म्हणून काम करत आहे.
वकील सय्यद हसनने न्यूज-24 सोबत बोलताना सांगितले की, “मी माझ्या स्वतःच्या खटल्यासाठी न्यायालयात होतो. त्याच वेळी राहुल गांधीही आले आणि बरेच लोक त्यांच्यासोबत सेल्फी काढत होती. माझ्या एका मित्रानेदेखील तिथे त्यांच्यासोबत माझा फोटो काढला आणि मला पाठवला. मी तो फोटो फेसबुकवर पोस्ट केला. या ठिकाणी मी स्पष्ट करू इच्छितो की, मी न्यायाधीश किंवा राहुल गांधींचा वकील नाही. वकिली करत असल्यामुळे मी न्यायालयात होतो.”
मूळ पोस्ट – न्यूज24
पुढे, कीव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, लखनौ कोर्टात राहुल गांधी यांची सुनावणी अध्यक्ष अतिरिक्त मुख्य न्यायिक दंडाधिकारी आलोक वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली होते. अधिक महिती येथे व येथे वाचू शकता.
मूळ पोस्ट – डेक्कन हेराल्ड
पुढील सर्चमध्ये आम्हाला अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइटवर न्यायाधीश आलोक वर्मा यांचा फोटो आढळला. हा फोटो व्हायरल सेल्फीमधील व्यक्ती पेक्षा वेगळा होता.
मूळ पोस्ट – अलाहाबाद उच्च न्यायालय
काय आहे पूर्ण प्रकरण ?
लखनऊ न्यायालयाने 15 जुलै रोजी काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना 2022 मध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान भारतीय सैन्याबद्दल केलेल्या कथित टिप्पणीशी संबंधित मानहानीच्या खटल्यात जामीन मंजूर केला.
हा खटला बीआरओचे माजी संचालक उदय शंकर श्रीवास्तव यांनी दाखल केला होता, ज्यामध्ये त्यांनी दावा केला होता की, राहुल गांधींच्या टिप्पणीमुळे सैन्याची प्रतिष्ठा खराब झाली असून सैनिकांच्या प्रतिष्ठेचा अपमान झाला आहे. न्यायालयाने राहुल गांधींचा जामीन अर्ज स्वीकारला आणि त्यांना 20,000 रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर दोन जामीनदारांसह मुक्त केले. अधिक महिती येथे, येथे व येथे वाचू शकता.
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, व्हायरल फोटोमध्ये काळ्या कोटमध्ये राहुल गांधींसोबत सेल्फी काढणारा व्यक्ती न्यायाधीश नसून लखनऊ न्यायालयातील वकील आहे. खोट्या दाव्यासह फोटो व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:राहुल गांधींसोबत सेल्फी काढणारी व्यक्ती न्यायाधीश नसून वकील; वाचा सत्य
Fact Check By: SAGAR RAWATEResult: False
