
पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पाश्वभूमीवर एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये जमाव पोसिलांवर दगडफेक करताना दिसतात.
दावा केला जात आहे की, “पोलिसांवर जमावाद्वारे दगडफेक केल्याचा हा व्हिडिओ पश्चिम बंगालचा आहे.”
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ पश्चिम बंगालचा नसून नेपाळचा आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये जमाव दगडफेक करत असून पोलिस आपल्या सुरक्षा कवचा मागे लपून स्वतःचा बचाव करताना दिसतात.
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “पश्चिम बंगाल मध्ये बघा हिंदू ज्या पोलिसाच्या भरवशावर बसले आहेत तिथे जिहादी दगडफेक करून त्यांनाच खाली बसवले आहे.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ पश्चिम बंगालशी संबंधित नाही.
एक्सप्लोर नेपाळ नामक फेसबुक पेजने हाच व्हिडिओ 28 मार्च 2025 रोजी शेअर केला होता.
व्हिडिओमधील केलेल्या कमेंटसनुसार हा व्हिडिओ नेपाळमध्ये राजेशाही पुनर्संचयित करण्याच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनादरम्याचा आहे. अधिक माहिती येथे वाचू शकता.
https://www.facebook.com/share/r/16BicKtcxp
पुढे एका युट्यूब चॅनलवर हाच व्हिडिओ चांगल्या व स्पष्ट दृश्यमध्ये आढळला.
सदरील लक्षपूर्वक पाहिल्यावर आपल्याला भिंतीवर “घर आंगन रेस्ट्रो आणि सेकुवा” आणि एका इमारतीवर इंग्रजीत “लंडन कॉलेज” लिहिलेले दिसते.
हा धागा पकडून गुगल मॅपवर सर्च केल्यावर “घर आंगन रेस्ट्रो आणि सेकुवा” हे दुकान नेपाळची राजधानी काठमांडूमधील मदन भंडारी रोडवर आढळले.
खालील तुलनात्मक फोटो पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, व्हायरल व्हिडिओमधील भिंती मागे दाखलेली इमारत आणि गुगल मॅपच्या फोटोमध्ये दाखवलेली इमारत एकच आहे.
तसेच गुगल मॅपनुसार “घर आंगन रेस्ट्रो आणि सेकुवा” या दुकानापासून ते लंडन कॉलेजचे अंतर 180 मीटर आहे.
मूळ पोस्ट – गुगल मॅप
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ पश्चिम बंगालशी संबंधित नाही. पोलिसांवर ही दगडफेक नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये झाली होती. खोट्या दाव्यासह हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:जमावाद्वारे पोलिसांवर दगडफेक केल्याचा व्हिडिओ पश्चिम बंगालचा नाही; वाचा सत्य
Fact Check By: SAGAR RAWATEResult: False
