काँग्रेस आरक्षण संपवण्याचा विचार करत असल्याचे राहुल गांधी म्हणाले का? वाचा सत्य

Missing Context राजकीय | Political

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधीपक्ष नेते राहुल गांधी अमेरिकेच्या दौऱ्यावर असतानाचा एक मुलाखतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये राहुल गांधी म्हणतात की, “आम्ही आरक्षण संपवण्याचा विचार करत आहोत.”

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ अर्धवट असून भ्रामक द्वायसह शेअर केला जात आहे. राहुल गांधींनी आरक्षणविरोधात वक्तव्य केले नव्हते.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये राहुल गांधी म्हणतात की, “आम्ही आरक्षण संपवण्याचा विचार करत आहोत.”

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी परदेशात दिलेल्या एका मुलाखतीत आरक्षण रद्द करणार असल्याची स्पष्टोक्ती.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

कीव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ राहुल गांधींच्या अमेरिका दौऱ्यातील एका कार्यक्रमाचा आहे.

ते 10 सप्टेंबर रोजी अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमधील जॉर्जटाउन विद्यापीठच्या विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधत होते.

या कार्यक्रमाचा व्हिडिओ राहुल गांधीच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे.

संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यावर लक्षात येते की, राहुल गांधी आरक्षणविरोधात बोलत नव्हते.

या कार्यक्रमात एक महिलने राहुल गांधींना जातीवर आधारित आरक्षणविषयी प्रश्न विचारला होता. तो तुम्ही 53:35 मिनिटापासून पाहू शकता.

काँग्रेस पक्ष जातीवर आधारित आरक्षणाची वास्तविक समस्या सोडवण्याऐवजी केवळ तिच्या लक्षणांवर उपचार करते, असे या महिलेने म्हटले.

पुढे ती प्रश्न विचारते की, “जातीवर आधारित आरक्षणाबाबत राहुल गांधी आणि काँग्रेसची भूमिका काय? तसेच तुम्ही आणि तुमचा पक्ष आरक्षण या संकल्पनेपासून दूर जाण्याचा विचार करत आहात का?”

या प्रश्नाचे उत्तर देताना राहुल गांधी यांनी सुरुवातीला भारताचे आर्थिक निर्णय घेणाऱ्या अधिकारपदांवर अल्पसंख्याक, दलित आणि आदिवासी समाजाचे नगण्य प्रतिनिधित्व असल्याचा मुद्दा मांडला.

ते म्हणाले की, “सध्या भारताचे आर्थिक निर्णय सुमारे 70 नोकरशाहांद्वारे नियंत्रित केले जातात. त्यापैकी बहुतेक अधिकारी उच्च जातीतील आहेत. या 70 लोकांमध्ये एक आदिवासी, तीन दलित, तीन ओबीसी आणि एक अल्पसंख्याक आहेत. म्हणजेच काय तर देशातील 90 टक्के लोकांना देशाचा पैसा कसा खर्च करायचा हे ठरवणाऱ्या पदांवर केवळ 10 टक्के प्रतिनिधित्व मिळते.

पुढे त्यांनी विविध घटकांना मिळणाऱ्या आर्थिक लाभांमधील विषमतेचा मुद्दा मांडला.

“जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात आर्थिक आकडे पाहाल तेव्हा आपल्या लक्षात येईल की, शंभर रुपयामागे आदिवासींना दहा पैसे, दलित आणि ओबीसींना पाच-पाच रुपये अशी रक्कम मिळते. 90 टक्के भारताला पुढे जाण्याची संधीच मिळत नाही, ही समस्या आहे,” असे ते म्हणाले.

यानंतर देशातील श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत अनुसूचित जाती व जमातींमधील उद्योगपतींच्या अभावाविषयी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, “भारतातील प्रत्येक बिझनेस लीडर्सची यादी पहा. या यादीमध्ये आदिवासी, दलित आणि ओबीसींचे नाव दाखवा. टॉप 200 बिझनेस लीडर्स पैकी एक ओबीसी आहे. ओबीसी भारतातील 50 टक्के आहेत.”

आणि शेवटी मग राहुल गांधी मूळ प्रश्नाचे उत्तर देताना म्हणतात की, “आम्ही समस्येच्या लक्षणांवर उपचार करीत नाही. ही प्रतिनिधित्वाच्या अभावाची समस्या आहे. ती दूर करण्याची हे एकमेव साधन नाही; इतर साधने आहेत. जेव्हा भारतात सर्व घटकांना न्याय्य वागणूक आणि त्यानुसार वाटा मिळेले असेल तेव्हा आम्ही आरक्षण रद्द करण्याचा विचार करू, परंतु, सध्या भारतात तसे होताना दिसत नाही.”

राहुल गांधींचे स्पष्टीकरण

वॉशिंग्टनमधील नॅशनल प्रेस क्लबमध्ये 12 सप्टेंबर रोजी पारपडलेल्या परिषदेत राहुल गांधींनी सांगितले की, “काल कोणीतरी ‘मी आरक्षणाच्या विरोधात आहे,’ असा चुकीचा उल्लेख केला. मी पुन्हा-पुन्हा सांगत आहे की, “मी आरक्षणाच्या विरोधात नसून आम्ही आरक्षण 50 टक्क्या पुढे वाढवणार आहोत.”

पुढे ते जात जनगणनेबाबत सांगतात की, “आम्ही जे म्हणत आहोत ते फक्त आरक्षणाच्या कल्पनेपेक्षा वेगळे आहे. आम्हाला सर्वसमावेशक समाज हवा आहे. सर्वप्रथम सध्याच्या परिस्थिचा आढावा घेतल्यावर ती दुरुस्त करण्यासाठी (आम्ही) काँग्रेस अनेक धोरणे लागू करणार आहोत. आरक्षण त्यापैकी एक आहे.” अधिक माहिती आपण येथे वाचू शकता.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओमध्ये राहुल गांधींनी आरक्षण संपविणार असल्याचे म्हटले नाही. अर्धवट व्हिडिओद्वारे चुकीचा दावा केला जात आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:काँग्रेस आरक्षण संपवण्याचा विचार करत असल्याचे राहुल गांधी म्हणाले का? वाचा सत्य

Written By: Agastya Deokar  

Result: False