
सोशल मीडियावर सध्या स्वतःच्या मुलाला बेदम मारहाण करणाऱ्या बापाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये चिमुकल्याला दंडुक्याने अमानुषपणे मारहाण केली जाते.
हा व्हिडिओ शेअर करून सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. या नराधम बापावर त्वरीत कडक कारवाई करून पीडित मुलाची सुटका करण्याची मागणी केली जात आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ दोन वर्षांपूर्वी हैदराबादमध्ये झालेल्या प्रकरणाचा आहे.
काय आहे व्हिडिओमध्ये?
व्हिडिओमध्ये दिसते की, एक बाप मुलीला व्हिडिओ रेकॉर्ड करायला सांगून स्वतःच्याच मुलाला बेदम मारहाण करतो. मुलगा आणि मुलगी त्याला न मारण्याची खूप विनवणी करतात; परंतु, बापावर त्याचा काही परिणाम होत नाही.
व्हिडिओमधील भाषा मराठी असल्याने अनेकांना हा व्हिडिओ महाराष्ट्रातील असल्याचे वाटत आहे.
मूळ व्हिडिओ – फेसबुक । अर्काइव्ह
तथ्य पडताळणी
गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, हा व्हिडिओ गेल्या काही वर्षांपासून इंटरनेटवर उपलब्ध आहे. एका युजरने हाच व्हिडिओ 2021 साली फेसबुकवर शेअर केला होता.
अन्य एका युजरने हाच व्हिडिओ 2021 साली शेअर करून माहिती दिली होती की, हा व्हिडिओ हैदराबादमधील आहे.
हा धागा पकडून अधिक शोध घेतल्यावर न्यूज-18 वेबसाईटवर 30 नोव्हेंबर 2021 रोजी प्रकाशित बातमी आढळली. त्यानुसार, हैदराबादमधील चैत्रीनाका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे. पीडित मुलाने नातेवाईकांच्या घरी खोडकरपणा केला म्हणून वडिलांनी त्याला अशी बेदम मारहाण केली होती.
एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मारहाण करणाऱ्या बापाचे नाव अशोक घंटे आहे. मुलाने नातेवाईकाच्या घरी खोडसाळपणा केल्याचा राग आल्याने त्याने मुलाला मारले. एवढेच नाही तर त्याने त्याच्या मुलीला हा सर्व प्रकार मोबाईलमध्ये चित्रित करण्यास सांगितले. आईला याविषयी कळाल्यानंतर त्यांनी मारहाणीविषयी तक्रार दिली, असे चैत्रिनाका ठाण्याचे पोलिस निरीक्षक अब्दुल कादर जिलानी यांनी सांगितले.
टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, मुलाचे वडिल दारुच्या नशेत होते. त्यांच्यावर कलम 324 आणि बालन्याय कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, मुलाला बेदम मारहाण करणाऱ्या बापाचा व्हायरल व्हिडिओ हैदराबादमधील आहे. तसेच ही घटना तीन वर्षे जुनी असून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात आली होती.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:मुलाला क्रूरपणे मारणाऱ्या बापाचा तो व्हिडिओ हैदराबादचा; 2021 मधील घटना नव्याने व्हायरल
Written By: Agastya DeokarResult: Missing Context
