गुजरातच्या भावनगरमधील सिंहाच्या कळपाचा व्हिडिओ छत्रपती संभाजीनगरचा म्हणून व्हायरल

Social दिशाभूल करणाऱ्या I Misleading

छत्रपती संभाजीनगरमधील जटवाडा खुलताबाद रोडवर सिंहांचा कळप अढळला, असा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ छत्रपती संभाजीनगरचा नाही. हा सिंहांचा कळप गुजरातच्या भावनगरमध्ये आढळले होते.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये रस्त्यावर 4 सिंह दिसतात. सोबत लिहिलेले आहे की, “छत्रपती संभाजीनगर जतवाडा खुलताबाद रोड सिंह.”

मूळ पोस्ट – इंस्टाग्राम | आर्काइव्ह 

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, सिंहाच्या कळपाचा हा व्हिडिओ गेल्या महिन्यातील असून छत्रपती संभाजीनगरचा नाही.

न्यूज18 गुजरातीने हाच व्हिडिओ 7 डिसेंबर 2023 रोजी युट्यूबवर शेअर केला होता. कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “भावनगर जिल्ह्यातील सिहोर जंगलात 8 सिंहांचा अधिवास.” 

न्यूज18 गुजरातीच्या बातमीनुसार भावनगरमध्ये चिंकारा आणि नीलगायांची संख्या जास्त असल्याने सहज शिकार मिळेल. या हेतूने सिंहांनी या ठिकाणाची निवड निवासस्थान म्हणून केली आहे. तसेच ही संख्या वाढवण्यासाठी वन विभाग प्रयत्न करत आहे. भावनगरमधील 25 हजार हेक्टरवर पसरलेल्या हिरवे क्षेत्र सिंहांच्या अधिवासासाठी निवडले आहे. सध्या सिहोरच्या जंगलात 8 तर पालीताणा जंगलात 11 सिंहांचे वास्तव्य आहे. तसेच वनविभागाने स्थानिकांना आवाहन केले की, “आपल्या भागात सिंह आढळल्यास आमच्याशी संपर्क साधावा आणि सावधगिरी बाळगावी सिंहाना त्रास देऊ नये.”

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ छत्रपती संभाजीनगरचा नाही. हा सिंहाचा कळप गुजरातमधील भावनगरमध्ये आढळला होता. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:गुजरातच्या भावनगरमधील सिंहाच्या कळपाचा व्हिडिओ छत्रपती संभाजीनगरचा म्हणून व्हायरल

Written By: Sagar Rawate 

Result: Misleading