
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये नौदल अधिकारी लेफ्टनंट विनय नरवाल यांचा मृत्यू झाला होता. यानंतर सोशल मीडियावर एका जोडप्याचा व्हिडिओ व्हायरल होऊ लागला. सोबत दावा केला जात आहे की, विनय यांचा हत्या होण्यापूर्वीचा हा शेवटचा व्हिडिओ आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही पोस्ट आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळअंती कळाले की, या व्हिडिओमध्ये दिसणारे जोडपे विनय व त्यांची पत्नी हिमांशी नाहीत. दुसऱ्याच जोडप्याचा व्हिडिओ चुकीच्या दाव्यसह शेअर होत आहे.
काय आहे दावा?
बैसरन व्हॅलीमध्ये चित्रित झालेल्या या 21 सेकंदाच्या क्लिपमध्ये लाल रंगाचे जॅकेट घातलेला एक व्यक्ती आणि सोबत त्याची पत्नी दिसते. दहशतवादी हल्ल्या होण्याआधी २० मिनिटांपूर्वीचे दृश्य असे व्हिडिओमध्ये लिहिलेले आहे. सोबत कॅप्शनमध्ये म्हटले की, “पहलगाम हल्ल्यातील शहीद नेव्ही लेफ्टनंट विनय नरवाल यांचा पत्नी सोबत शेवटचा व्हिडिओ!”
मूळ पोस्ट – फेसबुक
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम या व्हिडिओला रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, इन्स्टाग्राम युजर queenpriyaprasad नामक अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता.
23 एप्रिल रोजी हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता.
https://www.instagram.com/reel/DIxa_2pyO90
अनेकांनी हा व्हिडिओ मृत नौदल अधिकारी विनय नरवाल यांचा म्हणून शेअर केल्यानंतर या जोडप्याने स्वतःहून या दाव्याचे खंडन केले.
“आमच्या व्हिडिओला चुकीच्या माहितीसह शेअर केले जात आहे. मी नौदल अधिकारी विनय नरवाल नाही. मी व माझी पत्नी हल्ला होण्याआधीच तेथून निघून गेलो होतो. आम्ही सुखरूप आहोत.”
https://www.instagram.com/reel/DI3W39HMiOo
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, दुसऱ्याच जोडप्याचा व्हिडिओ विनय नरवाल यांचे पत्नीसोबतचे शेवटचे क्षण म्हणून व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:तो व्हायरल व्हिडिओ नौदल अधिकारी विनय नरवाल यांचा नाही; वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
