
एक सैनिक त्याच्या साथीदारांसोबत एका महिलेला उचलून घेऊन जातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दावा केला जात आहे की, या व्हिडिओमध्ये इस्लामिक दहशतवाद्यांनी एका ख्रिश्चन मुलीचे अपहरण केले.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमधील महिला ख्रिश्चन नसून कुर्दिश महिला संरक्षण युनिट्सची (YPJ) सैनिक आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओ शेअर करताना युजर्स कॅप्शनमध्ये लिहितात की, “या व्हिडिओमध्ये इस्लामिक जिहादी एका ख्रिश्चन मुलीला ‘माल ए गनिमत’ म्हणून घेऊन जात आहे.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ 5 वर्षांपूर्वीचा आहे.
रुडाव इंग्लिश नामक वृत्तसंस्थेने हाच व्हिडिओ 26 ऑक्टोबर 2019 रोजी ट्विटरवर शेअर केला होता.
व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये माहिती दिली होती की, “तुर्की-समर्थित सैनिकांनी महिला सैनिकाला पकडल्यानंतर कुर्दिश सैन्याने आवाहन केले.”
तसेच व्हिडिओच्या ग्राफिकमध्ये लिहिले होते की, या महिलेचे नाव सिसेक कोबान असून ती कुर्दिश महिला संरक्षण युनिट्सची (YPJ) सदस्य आहे.
मूळ पोस्ट – ट्विटर | आर्काइव्ह
सदरिल पोस्टसोबत रुडाव इंग्लिश वृत्ताने दिलेल्या बातमीनुसार, ही घटना 21 ऑक्टोबर 2019 रोजी रात्री 9:00 वाजता घडली होती. तुर्की-समर्थित सैन्य सीरियन नॅशनल आर्मीने (SNA) ऐन अल-इसा येथील मिश्राफा गावावर हल्ला केला होता. ज्यामुळे त्यांचा कुर्दिश सैनिकांशी संघर्ष झाला होता.
या लढाईदरम्यान महिला संरक्षण युनिट्ससह (YPJ) एक महिला सेनानी सिसेक कोबानेच्या पायाला गोळी लागली आणि सीरियन नॅशनल आर्मीने तिला पकडले होते.
जन्मठेपेची शिक्षा
तुर्की मीडिया आउटलेट TRT वर्ल्डच्या ट्विटद्वारे पुष्टी केल्यावर कळाले की, तुर्की YPJ ला दहशतवादी गट मानते आणि सीरियन नॅशनल आर्मीने कोबानेला तुर्कीकडे सुपूर्द केले होते.
खालील व्हिडिओमध्ये सिसेक कोबाने म्हणते की, ” त्यांनी मला रुग्णालयात नेले आणि माझ्यावर उपचार केले.”
तुर्कीने 2021 मध्ये स्पष्ट केले की, सिसेक कोबान ही दहशतवादी संघटनेचा सदस्य असून तिने तुर्कीमध्ये अनेक नागरिकांची हत्या केली आहे. त्यामुळे सिसेकला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
तर YPJ ने असा दावा केला की, सिसेकला सीरियामध्ये पकडण्यात आले असून तुर्कीला तिला शिक्षा करण्याचा कोणताही अधिकार नाही.
परिवाराची भेट
सिसेक ही कुर्दिश मुस्लिम महिला असून सध्या तिला तुर्कस्तानमधील सॅनलिउर्फा तुरुंगात ठेवण्यात आले.
सिसेक कोबानच्या परिवारने 5 मार्च 2020 रोजी तिला सॅनलिउर्फा तुरुंगात भेट दिली होती. संपूर्ण बातमी येथे वाचू शकता.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओमधील महिला ख्रिश्चन नसून कुर्दिश मुस्लिम आहे. तिचे नाव सिसेक कोबेन असून ती सिरियातील संरक्षण युनिटमधील एक सेनानी आहे. 5 वर्षांपूर्वी सीरियामधील आयन इसा शहरात लढाईदरम्यान तिला सीरियन नॅशनल आर्मीने पकडले होते.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:सिरियातील पाच वर्षांपूर्वीचा व्हिडिओ ख्रिश्चन मुलीचे अपहरणाच्या खोट्या दाव्यासह व्हायरल
Written By: Sagar RawateResult: False
