
सध्या सोशल मीडियावर अर्धनग्न अवस्थेत महिलेसोबत नाचणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, ही व्यक्ती भाजप आमदार अनिल उपाध्याय आहेत.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, हे कोणी आमदार अनिल उपाध्याय नाहीत. तसेच भाजप किंवा काँग्रेस पक्षामध्ये या नावाचे कोणतेही आमदार नाहीत. अनेकदा अनिल उपाध्याय या नावाने हा व्हिडिओ वेगवेगळ्या राजकीय पक्षांशी जोडून शेअर केला जात असतो.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती अर्धनग्न अवस्थेत महिलेसोबत नाचताना दिसते.
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “भाजप आमदार अनिल उपाध्याय यांच्या या विधानावर मोदीजी काय म्हणतील?”
मूळ पोस्ट – फेसबुक | इंस्टग्राम | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
सर्च केल्यावर कळाले की,अनिल उपाध्याय ही एक काल्पनिक व्यक्ती असून भाजप किंवा काँग्रेस पक्षात या नावाचा आमदार नाही.
राजकारण्यांचा डेटाबेस राखणारी माय नेता वेबसाइटवर शोध घेतल्यावर अनिल उपाध्याय नामक व्यक्ती भाजपची आमदार असल्याची कोणतीही माहिती आढळली नाही.
आम्हाला एकाच नावाच्या दोन व्यक्तींच्या प्रोफाइल सापडल्या. पहिली प्रोफाइल डॉ. अनिल उपाध्याय, जोधपूरचे बहुजन समाज पार्टीचे (बसपा) नेते. ज्यांनी 2018 मध्ये राजस्थानमधून निवडणूक लढवली आणि त्यात ते पराभूत झाले होते.
तर दुसरी प्रोफाइल लखनौचे अपक्ष उमेदवार अनिल कुमार उपाध्याय यांची आहे. त्यांनी 2007 आणि 2012 मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवली होती.
जुना व्हिडिओ
हाच व्हिडिओ 2019 मध्ये भाजपचे राज्यसभा खासदार सुधांशू त्रिवेदी यांच्या नावाने व्हायरल झाला होता. त्यावेळी फॅक्ट क्रेसेंडो तमिळने या व्हिडिओची तथ्य तपासणी केली होती.
यापूर्वीही अनिल उपाध्याय या नावासह विविध पक्षातील नेता म्हणून दिशाभूल करणारे आणि खोटे दावे पसरविले गेले होते. फॅक्ट क्रेसेंडोने त्या दाव्यांचे सत्य बाहेर आणले आहे. ते फॅक्ट-चेक आपण येथे (मराठी) व येथे (हिंदी) वाचू शकता.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, अनिल उपाध्याय नामक व्यक्ती भाजप किंवा इतर कोणत्याही पक्षात आमदार नाही. वेळोवेळी आमदार अनिल उपाध्याय हे नाव वापरुन अनेक व्हिडिओ खोट्या दाव्यासह शेअर केले जातात.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:अर्धनग्न अवस्थेत नाचणारी हा व्यक्ती कोणी आमदार अनिल उपाध्याय नाहीत; वाचा सत्य
Fact Check By: Sagar RawateResult: False
