दक्षिण कोरियातील घटनेचा व्हिडिओ कतारमध्ये इराणचा हल्ला म्हणून व्हायरल

False राजकीय | Political

इस्रायल-अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाशी जोडून सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला जात आहे. काही रिपोर्टनुसार, इराणने कतारवर मिसाईल हल्ले केले होते. याच पार्श्वभूमीवर एका इमारतीला भीषण आग लागल्याचा  व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होता आहे. दावा केला जात आहे की, इराणने कतारमधील गॅस प्लांटवर हल्ला केला आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओचा कतारमधील गॅस प्लांटवरील हल्ल्याशी काहीही संबंध नाही.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये एका इमारतीला भीषण आग लागलेली आणि धूर निघताना दिसतो.

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “ब्रेकिंग न्यूज: इराणने कतारमधील गॅस प्लांटवर हल्ला केला! असे सांगितले जात आहे की इथूनच भारताला सुमारे 47% गॅस पुरवठा होतो. प्रदेशात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणने आपल्या घातक मिसाईल ताकदीचे प्रदर्शन केले आहे. तज्ञांच्या मते, याचा जागतिक बाजारपेठ आणि ऊर्जा पुरवठ्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. याचा भारताच्या गॅस पुरवठ्यावर परिणाम होईल का? येत्या काही दिवसांत परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी –

सर्व प्रथम रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओचा कतारमधील गॅस प्लांटवरील हल्ल्याशी काहीही संबंध नाही.

“सीएनए” नावाच्या फेसबुक पेजवर हा व्हिडिओ 17 नोव्हेंबर 2025 रोजी अपलोड केलेला आढळला.

व्हिडिओसोबत दिलेल्या माहितीनुसार, ही भीषण आग 15 नोव्हेंबर 2025 रोजी दक्षिण कोरियातील दक्षिण चुंगचेओंग प्रांतातील चेओनान शहरात असलेल्या मोठ्या फॅशन लॉजिस्टिक्स सेंटरमध्ये लागली होती.

या आगीत लाखो कपडे जळून खाक झाले; मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.

पुढील तपासात, “न्यूजपॅच” या न्यूज वेबसाइटवर याबाबत रिपोर्ट मिळाला. त्यानुसार, ई-लँड लॉजिस्टिक्स गोदामात आग लागली होती आणि सुमारे 9 तासांनी आग नियंत्रणात आणण्यात आली.

तसेच 17 नोव्हेंबर 2025 रोजी “स्ट्रेट्स टाइम्स” या यूट्यूब चॅनेलवरही या घटनेचा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता, ज्यात ही दक्षिण कोरियातीलच घटना असल्याचे स्पष्ट होते. अधिक महिती येथे, येथेयेथे वाचू शकता. 

दरम्यान, 18 मार्च 2026 रोजी इराणने कतारमधील रास लाफान औद्योगिक शहरावर हल्ला केल्याची माहिती आहे. मात्र व्हायरल व्हिडिओचा या घटनेशी काहीही संबंध आढळत नाही.

निष्कर्ष 

यावरून स्पष्ट होते की, व्हायरल व्हिडिओ कतारमधील गॅस प्लांटवरील हल्ल्याशी काहीही संबंध नाही. मुळात हा व्हिडिओ दक्षिण कोरियातील चेओनान येथे असलेल्या ई-लँड लॉजिस्टिक्स सेंटरमध्ये लागलेल्या आगीचा आहे. खोट्या दाव्यासह हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम ट्विटर येथे फॉलो करा.)

Result Stamp

Title: दक्षिण कोरियातील घटनेचा व्हिडिओ कतारमध्ये इराणचा हल्ला म्हणून व्हायरल

Fact Check By: Sagar Rawate

Result: False


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *