
आग लागलेल्या घरावर गोळीबार करून दहशतवाद्यांना मारतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जम्मू-काश्मीरमधली पहलगाम येथे हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना अशा प्रकारे ठार करण्यात आले, या दाव्यासह हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही पोस्ट आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, सदरील व्हिडिओ जुना असून त्याचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काही संबंध नाही.
काय आहे दावा?
आगीत होरपळणाऱ्या घरावर जोरात गोळीबार सुरू असतानाचा हा व्हिडिओ आहे. सोबत म्हटले आहे की, “ठोकले सर्व. भारत माता की जय”
मूळ पोस्ट – फेसबुक
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, हा व्हिडिओ गेल्या अनेक वर्षांपासून इंटरनेटवर उपलब्ध आहे.
एका युट्यूब चॅनेलवर 12 मे 2021 रोजी हाच व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता. सोबत माहिती दिली होती की, अंनतनाग येथे वैलू कोकनाग भागात ती दहशतवाद्यांना मारण्यात आले होते.
जम्मू काश्मीर पोलिसांनीसुद्धा या कारवाईबद्दल ट्विट करून माहिती दिली होती. ११ मे २०२१ रोजी लष्कर-ए-तोयबा संघटनेचे तीन दहशतवादी शेखपूरा गावातील एका घरात लपून बसले होते. ही माहिती मिळताच भारतीय सैन्याने कारवाई करून त्यांना असे ठार केले होते. मृत दहशतवाद्यांची नावे इलियास अहमद दार, उबैद शफी आणि अकीब अहमद लोन असे होते.
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, चार वर्षांपूर्वीचा व्हिडिओ पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शेअर केला जात आहे. हा व्हिडिओ अनंतनाग येथे २०२१ साली झालेल्या कारवाईचा आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:पहलगाम हल्ल्याकरांचे घर जाळून ठार करण्यात आले का? जुना व्हिडिओ व्हायरल
Fact Check By: Agastya DeokarResult: False
