
मुंबईमध्ये सलग कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले असून तेथे रेड अलर्टचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर गेटवे ऑफ इंडियावर विशालकाय लाटा आदळतानाचा आणि समुद्राच्या पाण्याने ताज हॉटेलचा परिसर जलमय होतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जाता आहे की, व्हिडिओमधील दृश्य मुंबईमधील सध्याच्या पावसाचीस्थिती दर्शवत आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ 2021 मधील असून मुंबईमधील सध्या सुरू असलेल्या पावसाचा नाही.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये गेटवे ऑफ इंडियावर आदळणाऱ्या लाटा आणि ताज हॉटेल सभोवतालचा परिसर पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचे दिसतो.
टीव्ही9 मराठी (युट्यूब), साम टीव्ही आणि जय महाराष्ट्र न्यूजने 19 ऑगस्ट रोजी हाच व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “गेटवे ऑफ इंडिया परिसरात लाटा.”
मूळ पोस्ट – टीव्ही9 मराठी | साम टीव्ही | जय महाराष्ट्र न्यूज | आर्काइव्ह | फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ 4 वर्षांपासून इंटरनेटवर उपलब्ध आहे.
‘द ग्लोबल एक्झिबिशन’ नामक युट्यूब चॅनलने 23 जुलै 2021 रोजी हाच व्हिडिओ शेअर केल्याचे आढळले. कॅप्शनमध्ये “मुंबई पाऊस, गेटवे ऑफ इंडिया, ताज हॉटेल.” असे लिहिलेले होते.
पुढे अधिक सर्च केल्यावर एबीसी न्यूजने 19 मे 2021 रोजी याच व्हिडिओशी मिळताजुळती क्लिप शेअर केल्याचे आढळले. व्हिडिओसोबत माहिती दिली होती की, तौ’ते चक्रीवादळ भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर सरकत असताना मुंबईचा समुद्रकिनारा आणि गेटवे ऑफ इंडिया पाण्याखाली गेला होते. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार या वादळाचा वेग 100 मैल प्रतितास होता.
तसेच इंडियाटुडे, इंडियनएक्सप्रेस आणि न्यूज 18 वृत्त संस्थांनी त्यावेळी हाच व्हिडिओ शेअर करत अहवाल प्रकाशित केला होता की, ही घटना मे 2021 मध्ये महाराष्ट्रात तौ’ते चक्रीवादळ आदळले तेव्हाची आहे.
मूळ पोस्ट – इंडियन एक्सप्रेस
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ 4 वर्षांपूर्वीचा असून मुंबईमधील सध्याची परिस्थिती दर्शवत नाही. 2021 मध्ये मुंबईमधील समुद्रकिनाऱ्यावर तौ’ते चक्रीवादळ होते तेव्हा गेटवे ऑफ इंडियावर विशाल लाट आदळून ताज हॉटेलचा परिसर जलमय झाला होता. भ्रामक दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:गेटवे ऑफ इंडियावर लाटा आदळतानाचा 4 वर्षे जुना व्हिडिओ व्हायरल; वाचा सत्य
Fact Check By: SAGAR RAWATEResult: Misleading
