
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर सोशल मीडियावर बीडमध्ये घडलेल्या गुन्हेगारी घटनेचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी अमर देशमुख नामक व्यापाऱ्याला नुकतीच मारहाण केली अशा बातमीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमधील बातमी 5 वर्षांपूर्वीची आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमधील टीव्ही-9 मराठीच्या बातमीमध्ये मारहाणीचा सीसीटीव्ही फुटेज दाखवत सांगितले आहे की, “धनंजय मुंडेंच्या जवळील गणेश कराड नामक कार्यकर्त्याने त्यांच्या साथीदारांसोबत व्यापारी अमर देशमुख याला मारहाण केली.”
युजर्स सध्याच्या घडीला हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहितात की, “गुंडगिरी कायम.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
कीव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओमधील बातमी 5 वर्षांपूर्वीची आहे.
टीव्ही-9 मराठीने ही 18 फेब्रुवारी 2020 रोजी युट्यूबवर शेअर केली होती.
मूळ पोस्ट – युट्यूब | आर्काइव्ह
टीव्ही9 मराठी आणि एबीपी माझाच्या बातमीनुसार बीडच्या परळी शहरात 17 फेब्रुवारी 2020 रोजी दुपारी प्रॉपर्टीच्या वादातून एका व्यापाऱ्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काठी आणि रॉडने मारहाण करण्यात आली. विशेष म्हणजे मारहाण करणारा गणेश कराड धनंजय मुंडेंचा जवळचा कार्यकर्ता असल्याची माहिती आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.
धनंजय मुंडे यांचे ट्विट
हा व्हिडिओ माध्यमांवर आल्यावर धनंजय मुंडे यांनी या प्रकरणाची दखल घेत ट्विट करत माहिती दिली की, “आरोपींना अटक करुन 307 कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. ही मारहाण व्यक्तिगत कारणावरुन झाली असून कृपया या प्रकरणात माझे नाव जोडण्याचा प्रयन्त करू नये ही विनंती.”
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल बातमी सध्याची नसून 5 वर्षांपूर्वीची आहे. 2020 मध्ये टीव्ही-9 मराठीने बातमी दिली होती की, राष्ट्रवादी पक्षाचा (विभक्त होण्यापूर्वी) कार्यकर्ता गणेश कराडने आपल्या साथीदारांकडून व्यापारी अमर देशमुखांना मारहाण केली होती. धनंजय मुंडे यांनी प्रकरणाशी काही संबंध नसल्याचे सांगितले होते. जुना व्हिडिओ अर्धवट माहितीसह व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:जुना व्हिडिओ अलिकडे एका व्यापाऱ्याला धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याच्या दाव्यासह व्हायरल
Fact Check By: SAGAR RAWATEResult: Missing Context
